नताली वेबस्टर! तिची आई आणि आजोबा! वडिलांना घटस्फोट देऊन आईनं आजोबाशी म्हणजे सासऱ्याशी लग्न केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 08:56 IST2025-09-27T08:56:19+5:302025-09-27T08:56:44+5:30
तिच्या आईनं अशा माणसाशी लग्न केलं, जो एका वेगळ्याच पंथाशी संबंधित होता. लग्न झाल्यानंतर सात वर्षांनी तिच्या आईनं नवऱ्याशी घटस्फोट घेतला आणि त्याच्याच वडिलांशी म्हणजे सासऱ्याशी लग्न केलं

नताली वेबस्टर! तिची आई आणि आजोबा! वडिलांना घटस्फोट देऊन आईनं आजोबाशी म्हणजे सासऱ्याशी लग्न केलं
ती त्यावेळी फक्त पाच वर्षांची होती, पण त्यावेळचं सगळं काही तिला आजही खडा न् खडा आठवतं. समाजात, तिच्या कुटुंबात, घरात जे काही घडत होतं, त्यामुळे ती अतिशय अस्वस्थ होती. त्या ठिकाणी तिनं जे काही अनुभवलं, पाहिलं, ते सारंच कल्पनेपलीकडचं आहे. त्या ठिकाणी ती तब्बल ३५ वर्षे अडकून पडली होती, जिथे तिला एक क्षणभरही राहायचं नव्हतं, पण तिथून ती शेवटी ‘मुक्त’ झालीच आणि आपल्याच समाजाविरुद्ध तिनं दंडही थोपटले!..
ही कहाणी आहे अमेरिकेच्या नताली वेबस्टरची. ती आता ५३ वर्षांची आहे, पण तिनं अनुभवलेला एक-एक क्षण आजही तिला आठवतो आणि त्यामुळे ती अस्वस्थ होते. तिला घाबरायला होतं. तिची कहाणी आहे खरं तर एका वेगळ्याच पंथाची आणि ही कहाणी तिच्यापासून, तिच्या कुटुंबापासूनच सुरू होते. त्याचे फार मोठे चटके तिला संपूर्ण आयुष्यभर भोगावे लागले. आजही ते प्रसंग आठवले की तिच्या अंगाचा थरकाप होतो.
तिच्या आईनं अशा माणसाशी लग्न केलं, जो एका वेगळ्याच पंथाशी संबंधित होता. लग्न झाल्यानंतर सात वर्षांनी तिच्या आईनं नवऱ्याशी घटस्फोट घेतला आणि त्याच्याच वडिलांशी म्हणजे सासऱ्याशी लग्न केलं. नतालीसाठी हा खूप मोठा धक्का होता. नतालीचे आरोप आहेत की, धर्माच्या नावाखाली त्या पंथात छळ, बाल शोषण, अनैतिकता सगळं होतं. त्या पंथातले लोक मानव तस्करीही करीत होते. तरीही अनेक मोठी नावं या पंथाशी जोडलेली आहेत. नतालीला एवढंच माहीत होतं की आपले आई-वडील घटस्फोट घेत आहेत, पण आई आता कोणाशी लग्न करणार हे मात्र तिला ठाऊक नव्हतं. त्याच घरात राहात असलेल्या आजीला तिच्या आजोबांनी घटस्फोट दिला आणि लास वेगास येथे नतालीच्या आईशी लग्न केलं. त्यावेळी नतालीची आई पस्तिशीत, तर आजोबा साठीच्या घरात होते.
नताली म्हणते, या घरात प्रश्न विचारायला परवानगी नव्हती, जेव्हा मी विचारले, तेव्हा लहान असतानाच मला हवाई येथून वॉशिंग्टनला पाठवून देण्यात आलं.
१७ व्या वर्षी नतालीचं लग्न त्याच पंथातल्या एका व्यक्तीशी लावून देण्यात आलं. १९ व्या वर्षी ती आईही झाली. पण, तिला कधीच स्वतःला त्या पंथाशी जोडून घेता आलं नाही. ती कायम त्यातून बाहेर पडण्याचा विचार करीत होती. शेवटी २००८ मध्ये तिनं ठरवलं की आता काहीही करून इथून बाहेर पडायचंच. तिनं एक प्लॅन बनवला. काही दिवस आपल्याच घराच्या बेसमेंटमध्ये ती लपून राहिली आणि तिथून पळाली. आता ती स्वतःचं युट्यूब चॅनल चालवते आणि या पंथाविरोधात आवाज उठवते.
या पंथाची सुरुवात १९५० च्या दशकात लेखक एल. रॉन हुबार्ड यांनी केली होती. हा पंथ सुरुवातीपासूनच वादात राहिला आहे. तरीही अनेक प्रसिद्ध व्यक्ती या पंथाशी जोडल्या गेल्या. हॉलिवूड स्टार टॉम क्रूजनंही कधी काळी या पंथाच्या बाजूनं विधान केलं होतं. नतालीच्या आरोपांवर पंथाकडून सफाई देण्यात आली असून, हे सगळे आरोप खोटे असून, पंथाचे विचार अतिशय पुरोगामी आहेत, चुकीचं वागणाऱ्या लोकांना आधीच पंथातून काढून टाकण्यात आलं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. नतालीची ही कहाणी सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होते आहे.