डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 22:46 IST2025-12-31T22:43:42+5:302025-12-31T22:46:51+5:30
Nagpur Delivery Boy Viral Video: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये एका डिलिव्हरी बॉयला काही लोकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये एका डिलिव्हरी बॉयला काही लोकांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डिलिव्हरी बॉयची दुचाकी संबंधित लोकांच्या कारला घासल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एका रस्त्यावर डिलिव्हरी बॉयची दुचाकी आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला. या किरकोळ कारणावरून कारमधील चालक आणि त्याच्या साथीदारांचा संयम सुटला. 'डेडली कलेश' या सोशल मीडिया हँडलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला त्याच्या दुचाकीवरून खेचले आणि जमिनीवर पाडले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कारमधील दुसऱ्या व्यक्तीने बाहेर येऊन डिलिव्हरी बॉयला मारहाण केली. तर, डिलिव्हरी बॉय स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Road rage kalesh:
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) December 30, 2025
Blinkit delivery guy got brutally beaten up by car driver and Co passanger over minor crash.
📍Nagpur MH. pic.twitter.com/AtDbWYGmN0
सध्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू असतानाच ही घटना घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. किरकोळ वाहतूक वादातून होणाऱ्या घटना शहरात चिंतेचा विषय ठरत आहे.
नेटकऱ्यांचा संतापाची लाट
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. "काही रुपयांसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या या गरिबांशी लोक इतके क्रूर कसे वागू शकतात?" असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, "डिलिव्हरी बॉय, गार्ड आणि शिपाई यांच्यासाठी समाजात आदरच उरलेला नाही. तर दुसऱ्याने "माणुसकी कुठे गेली? देवाचे तरी भय बाळगा," अशा शब्दांत आपला निषेध नोंदवला आहे.