मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर रेल्वेतून उतरताना एक महिला थोडक्यात बचावली. ट्रेनमधून उतरताना या महिलेचा तोल गेला. ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये पडणारच होती, मात्र तेवढ्यात तेथे तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका जवानाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, या महिलेला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येईल.
नेमकं काय घडलं? -संबंधित महिला चालत्या ट्रेनमधून घाई घाईत उतरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, प्लॅटफॉर्मवर पाय ठेवताच, तिचा तोल गेला आणि ती ट्रेनखाली येऊ लागली. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफ जवान क्षणाचाही विलंब न करता महिलेच्या दिशेने थावला आणि त्याने महिलेला सुरक्षितपणे बाजूला ओढले. जर या जवानाला थोडाही विलंब झाला असता, तर एक अत्यंत दुःखद अपघात घडला असता.
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ -या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रेल्वे मंत्रालयाने आपल्या आधिकृत 'X' अकाउंटवर शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित जवान महिलेला पडताना पाहून तिच्या दिशेने धावतो आणि तिला वाचवतो. हा व्हिडिओ शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने लोकांना आवाहन केले आहे की, "कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करू नका. हे जीवघेणे ठरू शकते. बोरिवली स्टेशनवर महिलेचा तोल गेला, मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तिला वाचवले."
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. और अब तक इसे ९.८८ लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. तर अनेक लोक संबंधित जवानाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.