Fact Check : खरंच तब्बल ८२३ वर्षांनी येतोय का २०२६ मधील 'चमत्कारी' फेब्रुवारी महिना? काय आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:21 IST2026-01-31T15:55:56+5:302026-01-31T16:21:19+5:30
MiracleIn Fact Check : काही दाव्यांमध्ये फेब्रुवारी २०२६ मध्ये २५ तासांचा एक दिवस असेल, असंही सांगितलं जात आहे. मात्र वैज्ञानिकांच्या मते, या सर्व दाव्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.

Fact Check : खरंच तब्बल ८२३ वर्षांनी येतोय का २०२६ मधील 'चमत्कारी' फेब्रुवारी महिना? काय आहे सत्य
MiracleIn Fact Check : सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रोज कितीतरी गोष्टी व्हायरल होत असतात. कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, फेब्रुवारी २०२६ हा सामान्य महिना नसून ८२३ वर्षांनंतर येणारा चमत्कारी महिना आहे. या दाव्यानुसार या महिन्यात आठवड्यातील सर्व सातही दिवस चार-चार वेळा येतील. काही पोस्ट्समध्ये याला “MiracleIn Month” असं नाव देऊन हा मेसेज पुढे पाठवल्यास नशीब उजळेल, असंही म्हटले जात आहे. इतकंच नाही, तर काही दाव्यांमध्ये फेब्रुवारी २०२६ मध्ये २५ तासांचा एक दिवस असेल, असंही सांगितलं जात आहे. मात्र वैज्ञानिक आणि गणितज्ञांच्या मते, या सर्व दाव्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.
व्हायरल दावा नेमका काय आहे आणि भ्रम कसा पसरला?
व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजमध्ये सांगितले जात आहे की, फेब्रुवारी २०२६ मध्ये रविवार ते शनिवार असे सर्व दिवस चार-चार वेळा येतील, आणि असा संयोग ८२३ वर्षांत एकदाच येतो. यालाच “MiracleIn” असं नाव देऊन लोकांना मेसेज शेअर करण्याचं आवाहन केलं जात आहे. काही मेसेजमध्ये तर २५ तासांचा दिवस असल्याचाही दावा आहे. मात्र हे सर्व दावे अपूर्ण माहिती आणि चुकीच्या समजुतीवर आधारित आहेत.
गणित समजलं की ‘चमत्कार’ आपोआप संपतो
तज्ज्ञांच्या मते २०२६ हे लीप इयर नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये २८ दिवस असतील. २८ दिवस म्हणजे नेमके चार पूर्ण आठवडे. आणि एका आठवड्यात सात दिवस असल्याने, २८ दिवसांच्या महिन्यात आठवड्यातील प्रत्येक दिवस चार-चार वेळा येणं पूर्णपणे सामान्य आहे. हा नियम प्रत्येक नॉन-लीप इयरच्या फेब्रुवारीला लागू होतो. यात ना काही दुर्मिळ गणिती संयोग आहे, ना खास कॅलेंडर अलाइनमेंट. त्यामुळे “८२३ वर्षांत एकदाच” असा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.
‘MiracleIn’ आणि २५ तासांच्या दिवसाचं सत्य
कॅलेंडर आणि खगोलशास्त्र तज्ज्ञ स्पष्ट सांगतात की “MiracleIn” नावाची कोणतीही संकल्पना विज्ञानात अस्तित्वात नाही. हा केवळ सोशल मीडियावर तयार केलेला आकर्षक शब्द आहे. तसेच २५ तासांचा दिवस होण्याचा दावा देखील पूर्णपणे खोटा आहे. पृथ्वीच्या फिरण्यात सूक्ष्म बदल होतात, पण त्यामुळे अचानक एखाद्या दिवशी एक तास वाढत नाही.
फेब्रुवारी २०२६ मध्ये ना अतिरिक्त तास जोडला जाणार आहे, ना कोणतीही असामान्य खगोलीय घटना घडणार आहे. यापूर्वीही फॅक्ट-चेक एजन्सींनी असे दावे फेटाळून लावले आहेत.