आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 11:15 IST2025-10-19T11:06:19+5:302025-10-19T11:15:56+5:30
Indonesian Marriage Viral Story: ७४ वर्षीय नवरदेवाने आपल्या २४ वर्षीय नवरीला हुंडा म्हणून चक्क ३ अब्ज रुपये (इंडोनेशियन) दिले

आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
जकार्ता : प्रेम, पैसा आणि वादांनी भरलेली एक आगळीवेगळी विवाह कहाणी सध्या इंडोनेशियामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ७४ वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीने त्याच्यापेक्षा तब्बल ५० वर्षांनी लहान असलेल्या, २४ वर्षांच्या तरुणीशी लग्नगाठ बांधली आहे. पण या लग्नापेक्षा जास्त चर्चा आहे, ती वराने वधूला दिलेल्या कोट्यवधींच्या हुंड्याची आणि फसवणुकीची.
इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांतातील पचितान रीजन्सी येथे १ ऑक्टोबर रोजी हा विवाह संपन्न झाला. ७४ वर्षीय नवरदेवाने आपल्या २४ वर्षीय नवरीला हुंडा म्हणून चक्क ३ अब्ज रुपये (इंडोनेशियन) दिले, ज्याचे भारतीय चलनात मूल्य सुमारे १ कोटी ५९ लाख रुपये (₹ १.६ कोटी) आहे.
हुंड्याच्या रकमेवर वाद
सुरुवातीला हुंड्याची रक्कम १ अब्ज रुपये ( भारतीय ₹ ५३ लाख) ठरली होती, पण लग्नाच्या वेळी ती अचानक वाढवण्यात आली. तसेच, लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही प्रत्येकी १,००,००० इंडोनेशिअन रुपये रोख भेट देण्यात आले. या भव्य सोहळ्यामुळे या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. मात्र, त्यानंतर या विवाहाला वादाचे वळण लागले.
फोटोग्राफरची तक्रार आणि अफवांचे पीक
लग्न झाल्यानंतर लगेचच, वधू-वरांनी पैसे न देताच विवाहस्थळ सोडले आणि त्यांनी संपर्क तोडला, अशी सार्वजनिक तक्रार वेडिंग फोटोग्राफी कंपनीने केली. यानंतर सोशल मीडियावर अफवांचे पीक आले आहे.
काही लोकांनी हुंड्यापोटी दिलेला ३ अब्ज रुपयांचा चेक बनावट असल्याचा दावा केला. वराने वधूच्या कुटुंबाची मोटरसायकल घेऊन पळ काढल्याची अफवा पसरली.
सत्य काय?
फोटोग्राफरच्या तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, वराने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी हा विवाह खरा असून, दिलेला हुंडा देखील खराच असल्याचे सांगितले. हुंड्याची मोठी रक्कम त्यांनी बँक सेंट्रल एशियातून कर्ज घेतल्याचे सांगितले. वधूच्या कुटुंबीयांनीही या जोडप्याने लग्न केले असून ते सध्या हनीमूनवर असल्याचे स्पष्ट केले.
वधूच्या एका नातेवाईकाने सांगितले की, मुलीला या वृद्धाशी लग्न न करण्याची ताकीद दिली होती, पण तिने ऐकले नाही. आता मात्र या लग्नावरून मोठा गदारोळ माजला आहे.