माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान'

By मोरेश्वर येरम | Published: December 22, 2020 01:48 PM2020-12-22T13:48:11+5:302020-12-22T13:48:53+5:30

एका लग्नात तब्बल १० हजार जणांनी उपस्थिती लावली तरी कोणत्याही नियमांचा भंग झाला नाही.

malaysia couple holds 10000 people drive thru wedding | माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान'

माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला १०,००० लोक येतात तेव्हा...; मलेशियातील लय भारी 'शुभमंगल सावधान'

Next

क्वालालंपूर
कोरोनाच्या संकटात जगातील बहुतांश देशात लग्न समारंभांला पाहुण्यांच्या उपस्थितीवर निर्बंध असताना मलेशियात मात्र एका राजेशाही लग्नात तब्बल १० हजार जण उपस्थित होते. 

मलेशियात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम लागू करण्यात आले आहेत. यात लग्न समारंभात केवळ २० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. असं असतानाही एका लग्नात तब्बल १० हजार जणांनी उपस्थिती लावली तरी कोणत्याही नियमांचा भंग झाला नाही. त्यामुळेच या लग्न सोहळ्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. 

मलेशियाची राजनाधी क्वालालंपूर येथील मोठे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री टेंग्कू अदनान यांच्या मुलाचा हा विवाह सोहळा होता. मंत्र्याच्या मुलाचं लग्न म्हटलं म्हणजे राजेशाही थाट आणि गर्दी होणारच. या लग्नाला १० हजार लोक उपस्थित होते. पण कोणत्याही नियमाचा भंग झाला नाही. असं कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

त्याचं झालं असं की, लग्नाला उपस्थित राहण्यासाठी निर्धारित लोकांव्यतिरिक्त इतर कुणीही उपस्थित राहून एका ठिकाणी गर्दी केली नाही. नवदाम्पत्य रस्त्याच्या एका बाजूला उभं होतं आणि येणारा प्रत्येक पाहुणा कारमधून खाली न उतरताच दाम्पत्याला शुभेच्छा देऊन निघून जात होता. यामुळे पाहुण्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देखील दिले आणि कोणत्याही नियमाचा भंग देखील झाला नाही. 

असं झालं रिसेप्शन
क्वालालंपूरमध्ये रविवारी एका सरकारी भवनामध्ये विवाह संपन्न झाला. त्यानंतर धीम्या गतीनं चालणाऱ्या कारमधून प्रत्येक पाहुण्याने नवरदेव टेंग्कू मोहम्मद हाफिज आणि वधू ओसियन अलेगिया यांना आशीर्वाद दिले. कारच्या काचा खाली करण्यात आल्या होत्या आणि कारमध्ये बसलेल्या प्रत्येकाने मास्क घातला होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन झालं आणि नियम मोडता सर्वांना लग्नाला उपस्थित राहता आलं. या अनोख्या प्रकारामुळेच संपूर्ण जगात या लग्न सोहळ्याची चर्चा होत आहे. 

जेवणंही कारमध्येच
लग्न सोहळ्याला १० हजार लोक येणार असल्याची कल्पना आम्हाला आधीपासूनच होती, असं टेंग्कू अदनान यांनी सांगितलं. "लग्न सोहळ्याला उपस्थिती लावलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा उत्साह पाहून मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कारमधून न उतरता नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले आणि नियम भंग होणार नाही याची काळजी घेतली. याचा मला आनंद आहे", असं टेंग्कू अदनान म्हणाले. लग्न सोहळ्यातून सर्व कार मार्गस्थ होण्यासाठी तब्बल तीन तासांचा वेळ लागला. यावेळी लग्नात भोजन समारंभ आयोजित न करता थेट कारमध्येच प्रत्येकाला जेवणाच्या पॅकेट्सचं वाटप करण्यात आलं होतं.
 

Web Title: malaysia couple holds 10000 people drive thru wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.