सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कपल चालत्या बाईकवर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. या व्हिडिओने लोकांचं फक्त लक्ष वेधून घेतलं नाही तर वाहतूक नियमांच्या उल्लंघनावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशातील नोएडा वाहतूक पोलिसांनी या घटनेवर कठोर कारवाई केली असून मोठा दंडही वसूल केला.
व्हिडिओच्या सुरुवातीला एक तरुण आणि एक तरुणी बाईकवर बसलेले दिसत आहेत. तरुणाने पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली आहे, तर मुलगी तरुणाच्या बाईकच्या टाकीवर बसून तरुणाला मिठी मारत आहे. हे करताना दोघांनाही अजिबात लाज वाटली नाही. लोकांनी हे दृश्य त्यांच्या मोबाईलवर रेकॉर्ड केलं. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हे स्पष्ट होतं की, दोघेही वाहतूक नियमांचं उल्लंघन करत आहेत. बाईकवर कपलच्या रोमान्सच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, नोएडा वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तरुणाने अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, तरुणाने केवळ वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं नाही तर त्याचा आणि मुलीचा जीवही धोक्यात घातला.
पोलिसांनी अनेक कलमांचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये धोकादायक वाहन चालवणं, हेल्मेटशिवाय बाईक चालवणं आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं यांचा समावेश आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५३,५०० रुपयांचा मोठा दंड आकारण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. सध्या लोक लोकप्रिय होण्याच्या नादात काहीही करत आहेत, हा त्यातलाच एक प्रकार आहे.