Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:17 IST2025-12-31T19:15:08+5:302025-12-31T19:17:23+5:30
Jodhpur Man Sets E-Rickshaw on Fire: जोधपूरमधील पंचवी रोडवर असलेल्या बजाज शोरूमबाहेर एका तरुणाने पाच लाख रुपयांची ई-रिक्षा पेटवून दिली.

Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
जोधपूरमधील पंचवी रोडवर असलेल्या बजाज शोरूमबाहेर एका तरुणाने आपल्या मालकीच्या इलेक्ट्रिक रिक्षावर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सततचा बिघाड आणि शोरूमकडून मिळणाऱ्या खराब वागणुकीमुळे या तरूणाने ई- रिक्षा पेटवून दिल्याचे सांगण्यात आले.
मोहन सोलंकी नावाच्या तरुणाने सुमारे दीड वर्षांपूर्वी ५ लाख रुपये खर्चून इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी केली. ७० हजार रुपये डाउन पेमेंट आणि उर्वरित रक्कम कर्जावर घेऊन त्याने आपला व्यवसाय सुरू केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रिक्षाच्या बॅटरीमध्ये समस्या येत होती. कंपनीने १७० किमी मायलेजचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात रिक्षा केवळ ७४ किमी धावत होती.
बजाज ऑटो के मालिक राजीव बजाज अक्सर मोदी सरकार पर निशाना साधते हैं की धंधा खराब हो रहा है मोदी सरकार अच्छा काम नहीं कर रहे
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) December 30, 2025
राजीव बाजार जी अगर आप अपनी क्वालिटी प्रोडक्ट बनाएंगे तो लोग अपने आप खरीदेंगे
मोदी कभी किसी से यह नहीं कहेंगे कि आप लोग राजीव बजाज की बाइक या राजीव बजाज… pic.twitter.com/HrnBbEhIHy
नेमके प्रकरण काय?
मोहनच्या म्हणण्यानुसार, गेल्या १४ दिवसांत त्याने ८ पेक्षा जास्त वेळा सर्व्हिस सेंटरला भेट दिली. कंपनीने तपासणीसाठी हैदराबादवरून इंजिनिअरलाही बोलावले, पण मायलेजची समस्या दूर झाली नाही. वारंवार चकरा मारूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मोहनने १३ दिवसांपूर्वी आपली ई-रिक्षा चक्क गाढवाला बांधून सर्व्हिस सेंटरला नेली होती, ज्याची मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, बुधवारी मोहनचा संयम सुटला. तो आपल्या पत्नी आणि भावासह शोरूमवर पोहोचला आणि रिक्षावर पेट्रोल ओतून पेटवून दिली. पत्नी रडत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, तर त्याचा भाऊ या घटनेचे चित्रीकरण करत होता. आजूबाजुच्या लोकांनी तत्काळ पाणी ओतून आग अटोक्यात आणली.
रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल
दुसरीकडे, शोरूमचे मालक हरीश भंडारी यांनी मोहनचे सर्व आरोप फेटाळून लावले. "तपासणीत रिक्षा पूर्णपणे ठीक असल्याचे आढळले. तरीही मोहन रिक्षा बदलून देण्यासाठी आमच्यावर विनाकारण दबाव आणत होता," असे त्यांनी म्हटले. याप्रकरणी शोरूम चालकांनी सरदारपुरा पोलीस ठाण्यात मोहनविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.