'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:14 IST2025-11-07T17:14:05+5:302025-11-07T17:14:33+5:30
ज्या सामान्य सेफ्टी पिनचा वापर आपण रोजच्या जीवनात करतो, त्याच पिनला प्राडाने 'सेफ्टी पिन ब्रोच' असे नवीन नाव देऊन बाजारात आणले आहे.

'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
फॅशनच्या जगात रोज काहीतरी अजब आणि अविश्वसनीय घडत असते, पण इटलीच्या अलिशान ब्रँड प्राडाने या वेळी जे केले आहे, ते पाहून सोशल मीडियावरील लोक अक्षरशः शॉक झाले आहेत. प्राडाने एक अशी वस्तू बाजारात आणली आहे, जी एखाद्या साध्या दुकानात अवघ्या १० रुपयांत डझनभर मिळते, पण प्राडाच्या शोरूममध्ये तिची किंमत आहे तब्बल ६९,००० रुपये!
ही गोष्ट दुसरी-तिसरी काही नसून, सेफ्टी पिन आहे. तीच सेफ्टी पिन, जी साडी किंवा ओढणी सावरण्यासाठी वापरली जाते. याच साध्या पिनला या लक्झरी ब्रँडने 'स्वेटर' घालून हजारोंनी विकायला काढले आहे.
पिन आहे की, सोन्याचा दागिना?
ज्या सामान्य सेफ्टी पिनचा वापर आपण रोजच्या जीवनात करतो, त्याच पिनला प्राडाने 'सेफ्टी पिन ब्रोच' असे नवीन नाव देऊन बाजारात आणले आहे. ब्रँडच्या वेबसाइटवर एका सेफ्टी पिनची किंमत ७७५ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे ६८,७२४.८३ रुपये इतकी आहे.
प्राडाच्या या पिनने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पिनमध्ये नक्की काय खास आहे, ज्यामुळे तिची किंमत एवढी आहे, असा प्रश्न लोक विचारत आहेत. ही पिन चंद्रावरून आणली आहे की काय?, असाही प्रश्न लोकांनी विचारला आहे. प्रत्यक्षात, ही एक साधी सोनेरी रंगाची धातूची पिन आहे, ज्यावर रंगीत धाग्यांनी डिझायनिंग केली आहे आणि एक लहानसा 'प्राडा'चा चार्म लावलेला आहे.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
प्राडाचा हा मास्टरपीस लाँच होताच सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला. एका इन्स्टाग्राम ब्लॉगरने तर थेट व्हिडीओ बनवून श्रीमंतांना घेरले आणि विचारले, "तुम्ही तुमच्या पैशांचे काय करत आहात? काही कल्पना नसेल, तर ते आम्हाला द्या!"
एका युजरने कमेंट केली की, "यापेक्षा चांगली डिझाईन माझ्या आजीने ५ मिनिटांत करून दिली असती, फक्त त्यावर प्राडाचा टॅग नसता." दुसऱ्याने चिमटा काढत लिहिले की, "आता सेफ्टी पिनसाठीही इन्शुरन्स काढावा लागेल." एका युजरने लिहिले, "पिन आहे की सोन्याची चिमणी?"