सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या माइलस्टोनवर चिकटवले जातीचे स्टिकर! पर्यटकाचा लडाखमध्ये निर्लज्ज स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:34 IST2026-01-21T14:34:57+5:302026-01-21T14:34:57+5:30
लडाखमध्ये मैलाच्या दगडावर स्टिकर चिकटवणाऱ्या थार चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या माइलस्टोनवर चिकटवले जातीचे स्टिकर! पर्यटकाचा लडाखमध्ये निर्लज्ज स्टंट
Social Viral: साहसी पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या लडाखमध्ये एका पर्यटकाच्या उद्धटपणाने नवा वाद निर्माण केला आहे. लेह-श्रीनगर महामार्गावरील सर्वात उंच ठिकाण मानल्या जाणाऱ्या फोटु ला पासवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अधिकृत मैलाच्या दगडावर स्वतःच्या जातीचा स्टिकर चिकटवणाऱ्या हरियाणाच्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर पर्यटकांच्या वागण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी, २० जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक १० सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये एक तरुण आपल्या महिंद्रा थार गाडीतून १३,४७९ फूट उंचीवर असलेल्या फोटु ला टॉपवर पोहोचलेला दिसतो. तिथे पोहोचल्यानंतर त्याने बीआरओने बसवलेल्या मैलाच्या दगडावर गुर्जर असे लिहिलेले स्टिकर चिकटवले. इतकेच नाही, तर कॅमेऱ्यासमोर हसत आणि अभिमानाने ही कृती करताना तो व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
बीआरओद्वारे तयार करण्यात आलेले हे मैलाचे दगड आणि दिशादर्शक फलक केवळ माहिती देण्यासाठी नसतात, तर दुर्गम सीमा भागात रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचे प्रतीक मानले जातात. अशा संवेदनशील क्षेत्रातील मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा मानला जातो. पर्यटकाने हा व्हिडिओ एखाद्या मोठ्या कामगिरीसारखा सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांचा पारा चढला आहे.
He went to a height of 13,479 feet to show the world how big of an idiot he is.
— Incognito (@Incognito_qfs) January 20, 2026
Why Thar owners are so stupid? pic.twitter.com/mBhkMkMDMQ
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणाच्या गाडीचा क्रमांक शोधून काढला. धक्कादायक बाब म्हणजे, या पर्यटकाच्या वाहनावर यापूर्वीच ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल १८ चालान प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून हा पर्यटक सराईतपणे नियम पायदळी तुडवणारा असल्याचे स्पष्ट होत आहे.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, "इतक्या उंचीवर जाऊन त्याने आपण किती मोठे मूर्ख आहोत हे जगाला दाखवून दिले आहे." तर दुसऱ्याने संताप व्यक्त करत, "अशा लोकांना एक महिना बीआरओचे रस्ते आणि फलक साफ करण्याची शिक्षा द्यायला हवी," असे म्हटले. लडाख पोलीस आणि संबंधित यंत्रणा आता या व्हिडिओच्या आधारे संबंधित व्यक्तीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.