ग्रेटर नोएडामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आयआयएमटी कॉलेजच्या पोस्टरमध्ये ज्या विद्यार्थ्याला १.८ कोटींच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे, तो प्रत्यक्षात आईस्क्रीम विकतो असा दावा व्हिडीओमध्ये केला जात आहे. हा व्हिडीओ लोकांमध्ये वेगाने व्हायरल झाला. तसेच यामुळे अनेक प्रश्न देखील निर्माण झाले.
'आज तक' फॅक्ट चेक टीमने या व्हिडिओची चौकशी केली तेव्हा संपूर्ण सत्य समोर आलं. तपासात हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचं आढळून आलं. प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचं नाव शैलेंद्र असून तो एक आईस्क्रीम विक्रेता आहे, तो इटावाचा रहिवासी आहे. त्याचा आयआयएमटी कॉलेजशी काहीही संबंध नाही.
शैलेंद्रने स्वतः सांगितलं की, व्हायरल व्हिडीओ त्याच्या मित्रांनी मस्तीमध्ये बनवला होता. हा व्हिडीओ इतक्या वेगाने व्हायरल होईल अशी त्याला अपेक्षा नव्हती. शैलेंद्रने या प्रकरणी पोलीस आणि कॉलेज प्रशासनाची माफी मागितली आहे आणि भविष्यात अशी चूक होणार नाही असे आश्वासन दिलं आहे. तो फक्त बारावीपर्यंत शिकला आहे आणि त्याच्या मित्राने सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला. व्हिडिओ व्हायरल होताच शैलेंद्र स्वतः घाबरला आणि त्याने आयआयएमटी कॉलेजशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
आयआयएमटी कॉलेजचे महासंचालक अंकुर जोहरी यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आणि सांगितलं की काही लोकांनी जाणूनबुजून कॉलेजची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ बनवला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, पोस्टरमध्ये दिसणारा तरुण कॉलेजचा एक विद्यार्थी आहे, ज्याला लंडनमधील एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पॅकेजवर नोकरी मिळाली आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.
पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नॉलेज पार्क पोलीस स्टेशनच्या पथकाने शैलेंद्रला पोलीस ठाण्यात बोलावलं. चौकशीदरम्यान शैलेंद्रने कबूल केलं की हा व्हिडीओ त्याच्या मित्रांनी मस्तीमध्ये बनवला होता. त्याने या घटनेबद्दल माफी मागितली आणि पोलिसांनी त्याला कडक इशारा देऊन सोडून दिलं. सध्या पोलीस आणि कॉलेज प्रशासनाने लोकांना कोणत्याही व्हायरल व्हिडिओवर पडताळणीशिवाय विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका असं आवाहन केलं आहे.