ज्यांना हाकललं, त्यांनीच जीव वाचवला!; थंडीत आईने सोडलेल्या नवजात बाळाभोवती श्वानांनी तयार केले 'सुरक्षा कवच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:28 IST2025-12-03T17:23:49+5:302025-12-03T17:28:02+5:30
पश्चिम बंगालच्या नबद्वीपमध्ये श्वानांनी रात्रभर रक्षण करत तान्हुल्या बाळाला दिले जीवदान.

ज्यांना हाकललं, त्यांनीच जीव वाचवला!; थंडीत आईने सोडलेल्या नवजात बाळाभोवती श्वानांनी तयार केले 'सुरक्षा कवच'
Stray Dogs Protect Newborn: पश्चिम बंगालमध्ये भटक्या श्वानांनी माणुसकीला लाजवेल असे काम करत एका नवजात बाळाचे प्राण वाचवले. आईने जन्म देऊन शौचालयाजवळ सोडून दिलेल्या एका तान्हुल्या बाळाभोवती चार भटक्या श्वानांनी रात्रभर रिंगण केले आणि त्याला थंडी व संकटांपासून वाचवले. पश्चिम बंगालच्या नबद्वीप शहरापासून १० किलोमीटर दूर असलेल्या स्वरूपनगर रेल्वे कॉलनीत सोमवारी पहाटे ही हृदयस्पर्शी घटना उघडकीस आली. रात्रीच्या वेळी काही स्थानिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता, पण तो आवाज शेजारच्या घरातून येत असावा, असा समज करून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
श्वानांनी रात्रभर केले संरक्षण
सोमवारी पहाटे राधा भौमिक या घराबाहेरील शौचालयाकडे जात असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज तीव्रतेने आला. त्यांनी पाहिले असता, एका निर्जन ठिकाणी बाळ पडले असून त्याच्याभोवती श्वानांचे एक कडे तयार झालेले होते. या श्वानांनी रात्रभर बाळाला थंड वाऱ्यापासून आणि इतर धोक्यांपासून संरक्षण दिले होते.
स्वतः राधा भौमिक यांनीच ते नवजात बाळ हातात घेतलं आणि मदतीसाठी लोकांना आवाज दिला. त्यानंतर त्यांच्या पुतणीने त्वरित बाळाला महेशगंज रुग्णालयात दाखल केले. बाळाच्या डोक्यावर रक्ताचे डाग वगळता त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील उपचारांसाठी त्याला कृष्णनगर सदर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बाळाला जीवदान मिळाल्यानंतर राधा भौमिक यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "ज्या श्वानांना आम्ही नेहमी हाकलून लावतो, त्यांनी जे काम केले ते अनेक माणसं करू शकली नाहीत. त्यांनी रात्रभर या बाळाला जीवंत ठेवले."
नबद्वीप पोलिसांनी चाइल्डलाइन अधिकाऱ्यांसह या घटनेचा तपास सुरू केला असून, बाळाला जन्म देऊन लगेचच कोणीतरी स्थानिक व्यक्तीने त्याला येथे सोडून दिले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बाल कल्याण समितीच्या मदतीने या बाळाच्या भविष्यातील देखभालीची सोय केली जात आहे. यापूर्वी कोलकाता येथेही अशाच प्रकारे भटक्या श्वानांनी एका नवजात मुलीचे संरक्षण केल्याची घटना घडली होती.