सात वर्षांपासून करत होता नोकरी, पहिल्यांदाच २० मिनिटं उशीर झाला अन् कंपनीने थेट कामावरूनच काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:07 IST2026-03-16T10:05:44+5:302026-03-16T10:07:04+5:30
एक पोस्ट व्हायरल झाली आणि लोकांचे त्याकडे लक्षही वेधले गेले. एका कार्यालयात नोकरी करत असलेल्या व्यक्तीला कंपनीने उशीर झाला म्हणून कामावरून काढून टाकले.

सात वर्षांपासून करत होता नोकरी, पहिल्यांदाच २० मिनिटं उशीर झाला अन् कंपनीने थेट कामावरूनच काढले
नोकरी करत असताना प्रत्येकजण कार्यालयात वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी घरातून निघण्यापासून ते बसच्या वेळाही पाळण्याचा प्रयत्न होतो. पण, काही वेळा धडपड करूनही उशीर होतोच. पण, म्हणून तुम्हाला कामावरून काढलं गेलं, तर...? अशीच घटना समोर आली आहे आणि त्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
हे प्रकरण तेव्हा चर्चेला आले, जेव्हा एका यूजरने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली. त्याने म्हटले आहे की, एक कर्मचारी मागील सात वर्षांपासून कंपनीमध्ये काम करत होता. या काळात तो कधीही ऑफिसमध्ये उशिरा आला नाही. पण, एक दिवस तो पहिल्यांदाच २० मिनिटे उशिरा आला आणि त्याच कारणाने कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकले.
काही दिवसांनी इतर कर्मचाऱ्यांना कळले
रेडिटवर केलेल्या या पोस्टनुसार, ही घटना मंगळवारी घडली. पण, इतर सहकाऱ्यांना याबद्दल काही दिवसांनी कळले. त्याला पहिल्यांदा २० मिनिटे उशीर झाला म्हणून कामावरून काढले गेले आहे. यात कंपनीच्या आणि कर्मचाऱ्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
पोस्ट लिहिणाऱ्याने म्हटले आहे की, सहकाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याच्या निर्णयाचा विरोध करण्याची तयारी इतर सहकारी करत आहेत. पुढच्या सोमवारी माझे सर्व सहकारी जाणीवपूर्वक ऑफिसला उशिरा येणार आहेत आणि जोपर्यंत कंपनी नोकरीवरून काढलेल्या सहकाऱ्याला पुन्हा कामावर घेत नाही, तोपर्यंत आम्ही असे करत राहणार आहोत.