भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 20:34 IST2026-01-06T20:33:38+5:302026-01-06T20:34:47+5:30
Viral Love Story: आजच्या काळात जिथे नाती टिकवणं कठीण झालंय, तिथे जयपूरच्या रस्त्यांवर सुरू झालेली ही 'इंटरनॅशनल' लव्हस्टोरी तुमचं मन जिंकेल!

भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
प्रेम हे आंधळे असते, असे म्हणतात, पण जयपूरच्या रस्त्यांवर सुरू झालेली ही प्रेमकहाणी वाचली तर प्रेम हे केवळ आंधळे नाही, तर अफाट शक्ती देणारे असते, याची खात्री पटेल. जयपूरमधील एका सामान्य रिक्षाचालकाच्या प्रेमात पडलेली फ्रान्सची तरुणी सारा आणि रिक्षाचालकाचा जयपूर ते फ्रान्स असा थक्क करणारा प्रवास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, १३ वर्षांपूर्वी सारा पर्यटनासाठी जयपूरमध्ये आली होती. तिथल्या एका स्थानिक रिक्षाचालकाच्या रिक्षातून तिने सुमारे दोन आठवडे जयपूरची स्वारी केली. या दोन आठवड्यांच्या प्रवासात त्यांच्यात संवाद वाढला, मैत्री झाली आणि पाहता पाहता या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सारा फ्रान्सला परतली, पण तिचे मन जयपूरच्या त्या रिक्षावाल्याकडेच राहिले.
त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण हा मार्ग सोपा नव्हता. साराच्या कुटुंबाने या नात्याला कडाडून विरोध केला. कारण मुलगा १० नापास असून व्यवसायाने रिक्षाचालक होता. शैक्षणिक पात्रता कमी असल्याने या तरुणाचा फ्रेंच व्हिसा अनेक वेळा नाकारण्यात आला. मात्र, सारा आणि या तरुणाने हार मानली नाही. तासन्तास चालणाऱ्या फोन कॉल्सनी त्यांचे नाते घट्ट ठेवले.
अखेर प्रेमाचा विजय!
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि प्रयत्नांनंतर, अखेर त्या तरुणाला फ्रान्सचा व्हिसा मिळाला. त्याने फ्रान्स गाठले आणि तिथल्या कायद्यानुसार साराशी लग्न केले. लोक म्हणायचे की "ती तुला सोडून जाईल", पण आज या गोष्टीला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडप्याला आता दोन गोंडस मुले असून ते फ्रान्समध्ये आपले सुखी संसार करत आहेत.