एकाच वेळी आकाशात दिसले चार ‘चंद्र’; ही दुर्मिळ खगोलीय घटना कुठे घडली? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 20:29 IST2026-02-01T20:27:28+5:302026-02-01T20:29:43+5:30
या घटनेने केवळ स्थानिक नागरिकच नव्हे, तर जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचेही लक्ष वेधले.

एकाच वेळी आकाशात दिसले चार ‘चंद्र’; ही दुर्मिळ खगोलीय घटना कुठे घडली? पाहा...
पृथ्वीभोवती एक चंद्र फिरतो. आतापर्यंत आपण एकच चंद्र पाहिला आहे. पण, जर कुणी तुम्हाला सांगितले की, त्याने चार चंद्र पाहिले, तर तुमचा विश्वास बसेल का? मात्र, रशियात चक्क चार चंद्र दिसले आहेत. रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात एकाच वेळी चार चंद्र दिसल्याचा दुर्मिळ आणि अद्भुत खगोलीय प्रकार पाहायला मिळाला. या घटनेने केवळ स्थानिक नागरिकच नव्हे, तर जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचेही लक्ष वेधले.
नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केले अद्भुत दृश्य
सेंट पीटर्सबर्गमधील नागरिकांनी आकाशात एकाच वेळी चार चंद्रसदृश प्रकाशबिंदू पाहताच आश्चर्य व्यक्त केले. क्षणातच अनेकांनी मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांमध्ये या दृश्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे टिपली. रशियाच्या RT या वृत्तसंस्थेनेही या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं तरी काय? वैज्ञानिकांचे स्पष्टीकरण
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, ही घटना ऑप्टिकल भ्रम (Optical Illusion) असून, तिला ‘पॅरासेलेने’ (Paraselene) किंवा ‘मून डॉग’ असे म्हणतात.
Four moons appear over Russia’s St. Petersburg
— RT (@RT_com) February 1, 2026
The spectacle, known as a paraselene, was created by moonlight bending through ice crystals in the frosty atmosphere pic.twitter.com/J5C5h4uDx8
पॅरासेलेने म्हणजे काय?
चंद्रप्रकाश थंड वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांवर (Ice Crystals) पडतो आणि हे स्फटिक लहान प्रिझमप्रमाणे काम करतात. चंद्राचा प्रकाश सुमारे 22 अंशांच्या कोनात वाकतो, परिणामी खऱ्या चंद्राच्या दोन्ही बाजूंना नकली चंद्रासारखे तेजस्वी ठिपके दिसतात. सामान्यतः अशा वेळी दोन मून डॉग दिसतात, मात्र सेंट पीटर्सबर्गमध्ये वातावरणातील विशेष परिस्थितींमुळे अनेक पॅरासेलेने एकाच वेळी तयार झाल्या, ज्यामुळे आकाशात चार चंद्र असल्याचा भास निर्माण झाला.
अत्यंत थंड हवामान कारणीभूत
सेंट पीटर्सबर्गमध्ये या काळात तापमान उणे 20 अंश सेल्सियसच्या खाली गेले होते. या तीव्र थंडीमुळे उच्च उंचीवर असलेल्या ढगांमध्ये सहा कोनीय बर्फाचे स्फटिक मोठ्या प्रमाणात तयार झाले आणि त्यामुळेच हे अद्भुत दृष्य दिसले. विशेषतः पौर्णिमेच्या आसपास चंद्र अधिक उजळ असल्याने अशी घटना अधिक ठळकपणे दिसते, असे खगोलतज्ज्ञ सांगतात.
‘सन डॉग’सारखीच असते ‘मून डॉग’ घटना
जसे एकाच वेळी एकापेक्षा अधिक सूर्य दिसण्याच्या घटनेला ‘सन डॉग’ (Parhelion) म्हटले जाते, तसेच चंद्राच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनेला ‘मून डॉग’ किंवा पॅरासेलेने म्हणतात.