धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:15 IST2025-12-30T19:14:07+5:302025-12-30T19:15:13+5:30
EngineAI Robot kicks Company CEO: शक्तिशाली रोबोटने खुद्द कंपनीच्या सीईओलाच लाथ मारून जमिनीवर पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल

धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
EngineAI Robot kicks Company CEO: तंत्रज्ञानाच्या जगात सध्या 'ह्युमनॉइड रोबोट्स'ची (मानवासारखे दिसणारे रोबोट) मोठी चर्चा आहे. मात्र, चीनमधील एका रोबोटिक्स कंपनीने नुकताच असा एक प्रयोग केला, ज्याचा व्हिडिओ पाहून जगभरातील नेत्यांपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्वच थक्क झाले आहेत. 'EngineAI' या चिनी स्टार्टअपच्या एका शक्तिशाली रोबोटने खुद्द कंपनीच्या सीईओलाच लाथ मारून जमिनीवर पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे नेमकी घटना?
EngineAI कंपनीने त्यांचा नवीन 'T800' हा ह्युमनॉइड रोबोट विकसित केला आहे. या रोबोटची ताकद आणि चपळता सिद्ध करण्यासाठी कंपनीने एक विशेष चाचणी घेतली. या चाचणीत कंपनीचे संस्थापक आणि सीईओ झाओ टोंगयांग (Zhao Tongyang) स्वतः रोबोटसमोर उभे राहिले. व्हिडिओमध्ये दिसते की, रोबोटने एक जोरात 'फ्रंट किक' मारली, ज्यामुळे सीईओ टोंगयांग थेट जमिनीवर कोसळले. त्यांनी संरक्षणासाठी शरीरावर जाड 'प्रोटेक्टिव्ह गियर' घातले होते, तरीही रोबोटचा प्रहार इतका जबरदस्त होता की त्यांना स्वतःचा तोल सावरता आला नाही.
असा प्रयोग का केला?
यापूर्वी EngineAI कंपनीने या रोबोटचे बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्स करतानाचे काही व्हिडिओ शेअर केले होते. मात्र, अनेक नेत्यांनी आणि नेटकऱ्यांनी हे व्हिडिओ 'CGI' किंवा बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. आपल्या रोबोटची ताकद खरी आहे आणि तो खरोखरच इतक्या वेगाने हालचाली करू शकतो, हे जगाला दाखवण्यासाठी सीईओ झाओ टोंगयांग यांनी स्वतःला धोक्यात घालून हा प्रयोग केला. प्रयोगानंतर त्यांनी सांगितले की, जर सुरक्षा कवच नसेल, तर या रोबोटच्या एका लाथेने कोणत्याही माणसाचे हाड मोडू शकते.
T800 रोबोटची खासियत काय?
हा रोबोट सुमारे ५.६ फूट उंच असून याचे वजन ८५ किलो आहे. हा रोबोट ३ मीटर प्रति सेकंद वेगाने चालू शकतो. यात NVIDIA AGX Orin एआय सिस्टम वापरण्यात आली असून त्याचे जॉइंट्स ४५० Nm टॉर्क निर्माण करतात, ज्यामुळे त्याला मानवासारखी ताकद मिळते. तसेचयात सॉलिड-स्टेट लिथियम बॅटरी आहे, जी ४ तासांपर्यंत उच्च क्षमतेने काम करू शकते.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एआय आणि रोबोट्सच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा नवीन वाद सुरू झाला आहे. जर हे रोबोट्स मानवापेक्षा इतके शक्तिशाली झाले, तर भविष्यात ते मानवासाठी धोक्याचे ठरू शकतात का, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.