डॉली चहावाला बनला बिझनेसमॅन, केली देशभरात फ्रॅंचायजी लॉन्चची घोषणा; 'अशा' लोकांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:03 IST2025-07-12T16:03:27+5:302025-07-12T16:03:55+5:30
Dolly Chaiwala Viral : @dolly_ki_tapri_nagpur या त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्यानं सांगितलं की, आता तो पूर्ण भारतात त्याच्या चहाची फ्रॅंचायजी सुरू करणार आहे.

डॉली चहावाला बनला बिझनेसमॅन, केली देशभरात फ्रॅंचायजी लॉन्चची घोषणा; 'अशा' लोकांचा शोध सुरू
Dolly Chaiwala Viral News: नागपूरमध्ये सदर बाजारात चहा विकणारा डॉली चहावाला (Dolly Chaiwala) आपल्या वेगळ्या साइट इंटरनेटवर चांगलाच फेमस झालाय. आता त्यानं आपला चहाचा बिझनेस एका वेगळ्या लेव्हलवर घेऊन जाण्याची घोषणा केली आहे. @dolly_ki_tapri_nagpur या त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर त्यानं सांगितलं की, आता तो पूर्ण भारतात त्याच्या चहाची फ्रॅंचायजी सुरू करणार आहे.
या घोषणेत डॉली चहावाल्याला 'भारतातील पहिला व्हायरल स्ट्रीट ब्रॅंड' म्हणण्यात आलं आहे. अनेकांना माहीत नसेल, पण डॉली चहावाल्याचं खरं नाव सुनील पाटील आहे. अब्जाधीश बिल गेट्स यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर डॉलीचं नशीब जोरावर आलं. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. आता त्यानं त्याच्या या प्रसिद्धीला बिझनेसमध्ये बदलत फ्रॅंचायजी मॉडल सुरू केलं आहे.
पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, "डॉली चहावाला फ्रॅंचायजीची अधिकृत घोषणा झाली आहे. हा भारतातील पहिला व्हायरल स्ट्रीट ब्रॅंड आहे, आणि आता ही एक बिझनेसची संधी आहे'.
पुढे माहिती देण्यात आली की, "गाड्यांपासून ते प्रमुख कॅफेपर्यंत, आम्ही याला पूर्ण देशात लॉन्च करत आहोत. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरी जिद्द असणाऱ्या लोकांचा आम्ही शोध घेतोय".
डॉली चहावाल्याच्या टी स्टॉलचं नाव 'डॉली की टपरी' नागपूरच्या सदर भागात आहे. असं सांगितलं जातं की, या स्टॉलमधून दर महिन्याला तो साधारण १ लाख रूपये कमाई करत आहे. आता तो देशभरात त्याचा चहा विकणार आहे. त्याच्या फॅन्सची संख्याही लाखोंमध्ये आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरून डॉलीच्या या घोषणेला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. एकानं लिहिलं की, "केवळ चहासाठी अशा फ्रॅंचायजीमध्ये गुंतवणूक करण्याचा निषेध करा, स्वत:वर विश्वास ठेवा किंवा आपल्या नावानं बिझनेस सुरू करा". दुसऱ्यानं लिहिलं की, "फ्रॅंचायजी असणारे चहा टाकताना आपली जीभ बाहेर ठेवतील का? जर नसेल ठेवणार तर डॉली चहावाल्याची फ्रॅंचायजी कशी असेल?".