Viral Video News: एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. एक पाळीव कुत्रा ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकतो आणि खाली पडतो. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं मालकाच्या चुकीमुळे घडलं. कुत्रा विरोध करत असताना मालकाने त्याला ट्रेनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला अन् तो खाली पडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना राजधानी एक्स्प्रेसमध्ये चढताना घडली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>हॉरिबल! धडकेत जखमी झालेल्याला कारमध्ये बसविले, पुढे पुलाखाली फेकले
ही घटना कोणत्या रेल्वे स्टेशनवर घडली, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओमध्ये राजधानी एक्स्प्रेसची बोगी नंबर १९३७५१ दिसत आहे. याच बोगीजवळ ही घटना घडली आहे.
काळजाचा थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओमध्ये काय?
व्हिडीओची सुरूवात होते तेव्हा एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासह प्लॅटफॉर्मवर उभा आहे. त्यानंतर रेल्वे धावायला लागते, त्यावेळी हा व्यक्ती ट्रेनच्या दरवाज्याजवळील हॅण्डल पकडून चढण्याचा प्रयत्न करतो. तो कुत्र्याला खेचतो आणि एक्स्प्रेस गाडीमध्ये चढवण्याचा प्रयत्न करतो.
कुत्रा ट्रेनमध्ये चढताना घसरतो आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जाऊन अडकतो. त्यानंतर कुत्रा खाली जाऊन पडतो.
काही रिपोर्टनुसार, या घटनेत कुत्रा वाचल्याचे म्हटले आहे. पण, याला अधिकृतपणे दुजोरा मिळू शकलेला नाही.
मालकावर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोक या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करत आहे.
एका व्यक्तीने म्हटले आहे की, भारतीय न्याय संहितेतील प्राणी क्रूरता नियम ३२५ नुसार या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. राजधानी एक्स्प्रेस बोगी क्रमांकही या व्यक्तीने सांगितला आहे.