सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:47 IST2025-12-25T13:44:53+5:302025-12-25T13:47:00+5:30
Christmas Santa Gift Viral Video: ऑफिसमधल्या सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला नेमके काय गिफ्ट केले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
ख्रिसमस म्हटले की उत्साह, आनंद आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू असे समीकरणच असते. सध्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सीक्रेट सांताची मोठी क्रेझ पाहायला मिळते. सहसा या खेळात लोक एकमेकांना चॉकलेट्स, परफ्यूम किंवा शो-पीस भेट देतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका अशा सीक्रेट सांताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने दिलेल्या गिफ्टची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी त्याला मिळालेले गिफ्ट सर्वांसमोर उघडताना दिसत आहे. सुरुवातीला एक मोठा बॉक्स दिसतो, जो उघडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरत नाही. या सीक्रेट सांताने कोणत्याही महागड्या वस्तूऐवजी एका मोठ्या बॉक्समध्ये कोबी, फ्लॉवर, गाजर आणि इतर भाज्या भरून भेट म्हणून दिल्या आहेत.
व्हिडीओ तुफान व्हायरल
हा व्हिडिओ 'तनुश्री' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. भाज्यांची ही अनोखी भेट पाहून ऑफिसमधील इतर कर्मचारीही पोट धरून हसताना दिसत आहेत. आतापर्यंतची ही सर्वात उपयुक्त भेट आहे, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून तो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने गमतीने लिहिले की, "वाढत्या महागाईच्या काळात यापेक्षा सर्वोत्तम आणि मौल्यवान भेट दुसरी कोणतीच असू शकत नाही."दुसऱ्याने लिहिले की, "प्रत्येकजण भाज्या खातो, त्यामुळे हे गिफ्ट वाया जाणार नाही, खूपच उपयुक्त!" तर तिसऱ्याने म्हटले आहे की, "पुढच्या वेळी मलाही असाच सांता हवा आहे."