प्रेमासाठी काय पण! "माझ्यासाठी माझी पत्नीच देव", आठवणीत बांधलं ६५ लाखांचं ६५ फूट भव्य मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:15 IST2026-02-17T12:13:57+5:302026-02-17T12:15:07+5:30
बालकिशुन राम यांनी आपली पत्नी शारदा देवी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ६५ लाख रुपये खर्च करून ६५ फूट उंच मंदिर उभारलं असून त्यात पत्नीची मूर्ती ठेवली आहे.

फोटो - ABP News
बिहारच्या पूर्व चंपारणमधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने जेव्हा संपूर्ण जग प्रेम व्यक्त करण्यात मग्न होतं, तेव्हा एका निवृत्त पंचायत सचिवाने आपल्या दिवंगत पत्नीबद्दल असं प्रेम व्यक्त केलं की, पाहणारे थक्क झाले. बालकिशुन राम यांनी आपली पत्नी शारदा देवी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ६५ लाख रुपये खर्च करून ६५ फूट उंच मंदिर उभारलं असून त्यात पत्नीची मूर्ती ठेवली आहे.
पूर्व चंपारण जिल्ह्यातील चकिया ब्लॉकमधील भुवन छपरा गावात हे मंदिर उभारण्यात आलं आहे. बालकिशुन राम दररोज सकाळी आणि संध्याकाळी या मंदिरात जाऊन आपल्या पत्नीच्या मूर्तीला फुलं अर्पण करतात. ते म्हणतात की, "मी देवाला कधी पाहिलं नाही, पण माझ्यासाठी माझी पत्नीच देव होती." या मंदिरात दररोज दिवा लावला जातो. शारदा देवी यांना चहा खूप आवडत असे, त्यामुळे त्यांच्या मूर्तीसमोर दररोज चहाचा कपही ठेवला जातो. तसेच दुपारचं आणि रात्रीचं जेवणही श्रद्धेने अर्पण केलं जातं.
बालकिशुन राम यांनी सांगितलं की, शारदा देवी यांना २००७ पासून हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु २०२२ मध्ये बालकिशुन यांच्या निवृत्तीच्या अवघ्या सहा महिने आधी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. पत्नीच्या जाण्याने बालकिशुन पूर्णपणे खचले होते. त्यांनी आपल्या निवृत्तीचे ६५ लाख रुपये पत्नीची आठवण अजरामर करण्यासाठी खर्च केला. ते म्हणतात की, "जर माझ्याकडे ६५ कोटी रुपये असते, तर ते सुद्धा मी पत्नीसाठी खर्च केले असते."
आपल्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आठवताना बालकिशुन यांचा कंठ दाटून येतो. लहानपणी वडिलांच्या निधनानंतर त्यांना शिक्षण सोडावं लागलं होतं. त्यावेळी शारदा देवी यांनी स्वतःचे दागिने विकून पतीला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्या स्वतः मजुरी करायच्या, घर सांभाळायच्या आणि पतीची हिंमत वाढवायच्या. बालकिशुन सांगतात की, त्यांच्या पत्नीच्या त्याग आणि कष्टांमुळेच ते 'पंचायत सचिव' बनू शकले. आता सोशल मीडियावर लोक या प्रेमाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. "खरं प्रेम हे मृत्यूनंतरही जिवंत राहतं" अशी भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.