हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:54 IST2025-11-22T19:54:26+5:302025-11-22T19:54:47+5:30
१३ महिन्यांच्या एका मुलाने दूध समजून ड्रेन क्लीनर प्यायलं आहे.

हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
घरामध्ये लहान मुलं असतील तर पालकांना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडे नीट लक्ष द्यावं लागतं. जर चुकूनही मुलांकडे दुर्लक्ष झालं तर ते खूप महागात पडू शकतं. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. बर्मिंगहॅममध्ये १३ महिन्यांच्या एका मुलाने दूध समजून ड्रेन क्लीनर प्यायलं आहे. यामुळे चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली
लहान मुलाचे ओठ, जीभ आणि श्वसनमार्ग भाजला आहे. द सनमधील एका रिपोर्टनुसार, सॅम अनवर अलशमेरी असं या मुलाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर मुलाला हार्ट अटॅकही आला. सॅमचे वडील नदीन अलशमेरी यांनी सांगितलं की, "त्याची आई बाथरूम साफ करत असताना, मुलगा बाथरूममध्ये गेला आणि जमिनीवर असलेली ड्रेन क्लीनरची एक पांढरी बाटली उचलली."
"सॅमला वाटलं की हे दूध आहे. आम्हाला काय घडत आहे हे समजेपर्यंतच उशीर झाला. तो दूध समजून ड्रेन क्लीनर प्यायला होता." रिपोर्टनुसार, क्लीनर प्यायल्यानंतर सॅमचे ओठ, तोंड, जीभ आणि श्वसनमार्ग भाजला आणि तो काहीच बोलू शकत नव्हता. ही दुखापत एवढी गंभीर आहे की, सॅमचा आवाज आता कायमचाच गेला आहे. तो यापुढे कधीही एक शब्दही बोलू शकणार नाही.
सॅमला या घटनेनंतर तातडीने उपचारासाठी बर्मिंगहॅममधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे त्याला हार्ट अटॅक आला. सॅमचं हृदय जवळपास तीन मिनिटांसाठी थांबलं. डॉक्टरांनी त्याला पुन्हा जिवंत केलं. नंतर त्यांनी त्याच्या नाकातून नळी काढून टाकली आणि त्याच्या पोटात कायमची एक नळी बसवली असल्याची माहिती सॅमच्या वडिलांनी दिली आहे.