जिओ रे 'बाहुबली'; 'त्या' फोटोमुळे रातोरात स्टार झालेल्या 'सिलेंडर मॅन'ची 'दमदार' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 19:10 IST2021-06-29T19:01:21+5:302021-06-29T19:10:03+5:30

Ambernath Cylinder Man : सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 

Ambernaths Cylinder Man became a star overnight maharashtra social media viral photo | जिओ रे 'बाहुबली'; 'त्या' फोटोमुळे रातोरात स्टार झालेल्या 'सिलेंडर मॅन'ची 'दमदार' गोष्ट

जिओ रे 'बाहुबली'; 'त्या' फोटोमुळे रातोरात स्टार झालेल्या 'सिलेंडर मॅन'ची 'दमदार' गोष्ट

ठळक मुद्देसिलेंडर मॅनचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अंबरनाथमध्ये सागरचं होत आहे मोठं कौतुक

पंकज पाटील

अंबरनाथ : अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सागर जाधव असे या सिलेंडर मॅनचे नाव असून सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झालाय. त्यामुळे अंबरनाथमध्ये सागरचे मोठे कौतुक होत आहे. ३० किलोचा सिलेंडर उचलायचा, मग आपण ४५ किलोचे असून कसं चालेल? हे वाक्य आहे अंबरनाथचा सिलेंडर मॅन सागर जाधव याचे. याच जिद्दीतून सागरने गेल्या २-३ वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली आहे. त्यामुळे खांद्यावर सिलेंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच भासू लागला. 

सागर हा अंबरनाथच्या भारत गॅसची एजन्सी असलेल्या राणू गॅस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. २ दिवसांपूर्वी सागर हा अंबरनाथ स्टेशन परिसरात सिलेंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भामरे या तरुणाने त्याची पर्सनॅलिटी पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या नकळत फेसबुकवर टाकले. अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारने फेसबुकवर टाकले आणि हे फोटो तुफान व्हायरल झाले. अगदी वेबसिरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्स पासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरच्या या पर्सनॅलिटीचं कौतुक केले. सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला. १२ वी पर्यंत शिकलेल्या सागरचे बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झाले. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या सागरने १२ वी नंतर अंबरनाथला काका काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. तो राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅसचं गोडाऊन आहे. याचठिकाणी १२ वर्षांपासून सागर नोकरी करतोय. 

आधी अतिशय सडपातळ असलेल्या सागरला ३० किलोचा सिलेंडर उचलायचा तर आपण ४५ किलोचे असून कसे चालेल? असा प्रश्न पडला आणि त्याने मागच्या ३ वर्षांपासूनच जिममध्ये जाऊन शरीरयष्टी कमवायला सुरुवात केली. सागरच्या घरी त्याचे काका-काकू, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. अतिशय मेहनत करून, ४-४ मजले सिलेंडर खांद्यावर घेऊन चढून सागर त्याचे घर चालवतो. पण आयुष्य एका रेषेत चालले असताना अचानक असे काही तरी होईल, आणि आयुष्य रातोरात इतके बदलेल, असं स्वप्नातही वाटले नव्हते, असे सागर नम्रपणे सांगतो.

Web Title: Ambernaths Cylinder Man became a star overnight maharashtra social media viral photo