"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:32 IST2025-12-05T13:31:57+5:302025-12-05T13:32:26+5:30
स्वस्तात वस्तू विकण्याचा बहाणा करुन ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याला एका तरुणाने चांगलाच धडा शिकवला.

"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
Scammer Surrenders: देशभरात सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असताना, एका दिल्लीकर तरुणाने मात्र आपल्या बुद्धिमत्तेने आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य वापर करून एका स्कॅमरला जबरदस्त धडा शिकवला. तरुणाने चॅटजीपीटीच वापर करून एक बनावट पेमेंट लिंक तयार केली आणि ती स्कॅमरला पाठवून त्याचे थेट जीपीएस लोकेशन आणि फोटो मिळवले. आपले बिंग फुटल्याचे पाहून या स्कॅमरने अक्षरशः माफी मागायला सुरुवात केली.
या घटनेची सुरुवात फेसबुकवर झाली. तरुणाला त्याच्या कॉलेजमधील एका मित्राच्या नावाने जो आयएएस अधिकारी आहे मेसेज आला. मेसेजमध्ये दावा करण्यात आला की, त्या आयएएस अधिकाऱ्याचा एक सीआरपीएफ अधिकारी मित्र ट्रान्सफर होत असल्यामुळे, तो आपले महागडे फर्निचर आणि उपकरणे अत्यंत स्वस्त दरात विकत आहे. हा मेसेज वाचून तरुणाला लगेच संशय आला म्हणून त्याने थेट त्याच्या मित्राकडे याबाबत चौकशी केली. मात्र असा कोणताही मित्र त्याचे सामान विकत नव्हता. हे कळल्यावर तरुणाला फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. पण या तरुणाने स्कॅमरला धडा शिकवण्यासाठी हा खेळ पुढे सुरुच ठेवला.
जेव्हा स्कॅमरने आर्मी युनिफॉर्मचा प्रोफाइल पिक्चर असलेल्या दुसऱ्या नंबरवरून पेमेंटसाठी क्यूआर कोड पाठवला तेव्हा तरुणाने तांत्रिक अडचणींचे कारण देत वेळ मारून नेली. त्यानंतर त्याने आपला मास्टर प्लॅन अमलात आणला. त्याने चॅटजीपीटीला सूचना देऊन एक साधे पण प्रभावी वेबपेज कोड तयार करण्यास सांगितले. हे पेज अशा प्रकारे डिझाइन केले होते की, समोरच्याने त्यावर क्लिक करताच त्याचे जीपीएस लोकेशन आणि डिव्हाइसच्या फ्रंट कॅमेऱ्यातून फोटो आपोआप कॅप्चर होईल. तरुणाने हे ट्रॅकर पेज होस्ट केले आणि स्कॅमरला लिंक पाठवून सांगितले की, 'तुमचा क्यूआर कोड येथे अपलोड करा, म्हणजे पेमेंटची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.'
अन् स्कॅमर अडकला जाळ्यात
पैशाच्या हव्यासापोटी स्कॅमरने तरुणाने पाठवलेल्या लिंकवर लगेच क्लिक केले. लिंक क्लिक होताच, त्या फेक पेमेंट पोर्टलने स्कॅमरचे नेमके जीपीएस कोऑर्डिनेट्स, आयपी ॲड्रेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या चेहऱ्याचा स्पष्ट फोटो तात्काळ कॅप्चर केला. त्यानंतर या तरुणाने मग स्कॅमरला थेट त्याचा फोटो आणि त्याचे लोकेशन पाठवले.
हा पुरावा मिळताच स्कॅमरची पळता भुई थोडी झाली. घाबरलेल्या स्कॅमरने तातडीने वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून आणि मेसेज करून तरुणाची माफी मागण्यास सुरुवात केली. ' आई शप्पथ मी हे फसवणुकीचे काम पूर्णपणे सोडून देईन,' असे सांगितले आणि वारंवार माफी मागितली. हा अनुभव तरुणाने रेडिटवर "Used ChatGPT to locate a scammer and made him beg me" या कॅप्शनखाली पोस्ट केला, जो काही क्षणातच व्हायरल झाली.