पर्यटकांच्या गर्दीने सिंधुदुर्गातील किनारे गजबजले; नाताळ सण, सलग सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी किनारपट्टीला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:40 IST2025-12-27T14:40:28+5:302025-12-27T14:40:47+5:30
जलक्रीडा प्रकारांना मागणी

पर्यटकांच्या गर्दीने सिंधुदुर्गातील किनारे गजबजले; नाताळ सण, सलग सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी किनारपट्टीला पसंती
संदीप बोडवे
मालवण : नाताळच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः मालवण, देवगड आणि वेंगुर्ला तालुक्यांतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. पर्यटक सागरी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
मालवणमधील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, वायरी, आचरा, तोंडवळी या किनाऱ्यांबरोबरच वेंगुर्ला येथील वेळागर-शिरोडा आणि देवगड येथील मिठमुंबरी, कुणकेश्वर हे किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मालवण येथील किनाऱ्यांवर असलेले त्सुनामी आयलँड, सिंधुदुर्ग किल्ला, निवती रॉक्स बेटे, जय गणेश मंदिर, राजकोट किल्ला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहिले आहेत.
निवास व्यवस्था २८ डिसेंबरपर्यंत फुल्ल झाल्या असून, स्वच्छतागृहे, पाणी आणि पार्किंग अपुऱ्या पडत आहेत. पर्यटन व्यावसायिकांनी मूलभूत सुविधा वाढवण्याची मागणी केली आहे. पर्यटनवाढीचे कारण नाताळ सुटी आणि नववर्ष सणांच्या जोरदार सेलिब्रेशनमुळे देश-विदेशांतील पर्यटक कोकणाकडे वळले आहेत. दिवाळी हंगामातील पावसाचा फटका बसल्यानंतर हा हंगाम गजबजला आहे..
जलक्रीडा प्रकारांना मागणी
जलक्रीडा प्रकारांप्रमाणे स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राइड, बंपर राईड, बोटिंग सफारी, आणि स्नॉर्कलिंगला पर्यटकांच्या उड्या पडत आहेत. तारकर्ली खाडीत बॅकवॉटर बोटिंग करणे एक वेगळाच अनुभव आहे. डॉल्फिन सफारीसाठी मोठी मागणी आहे.
माशांचे दर वाढले
मालवणी खाद्यसंस्कृती सर्वत्र प्रसिद्ध आहे. खासकरून मालवणी जेवण. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे माशांचे रेट वाढले आहेत. सुरमई, पापलेट, प्राँन्स, या माशांना मोठी मागणी आहे. या पदार्थांचाही पर्यटक आनंद घेत आहेत.