सिंधुदुर्गचा विकास सुसाट व्हावा, अधिकाऱ्यांनी आडकाठी आणू नये; नितेश राणे यांचा कडक इशारा
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 11, 2026 14:11 IST2026-02-11T14:09:56+5:302026-02-11T14:11:03+5:30
दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर

सिंधुदुर्गचा विकास सुसाट व्हावा, अधिकाऱ्यांनी आडकाठी आणू नये; नितेश राणे यांचा कडक इशारा
सिंधुदुर्ग: "जिल्ह्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवून विकासाची जबाबदारी दिली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी ज्या गतीने धावतोय, त्या गतीने प्रशासकीय अधिकारी धावताना दिसत नाहीत. निधी अखर्चित राहणे ही गंभीर बाब असून, जिल्ह्याच्या विकासात आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," अशा कडक शब्दांत आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला सुनावले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे 'व्हिजन' मांडले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार आणि आता आमदार निलेश राणे यांच्या अनुभवाचा फायदा घेत जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर
नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाखांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दावोस येथे झालेल्या ४,५०० कोटींच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारामुळे (MoU) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. जिल्ह्यात पहिले 'फाईव्ह स्टार' हॉटेल उभे राहत असून, यामुळे पर्यटनाला नवी झळाळी मिळेल.
पायाभूत सुविधांचा विस्तार
चिपी विमानतळासह जलवाहतुकीवर त्यांनी विशेष भर दिला. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलवाहतूक आणि रो-रो सेवेमुळे दळणवळण सोपे होणार आहे. विकासासाठी ६०० कोटींचा आराखडा अपुरा असून, तो १००० कोटींपर्यंत नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
'ड्रग्ज'मुक्त सिंधुदुर्गाचा संकल्प
विकासासोबतच जिल्ह्याची तरुण पिढी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थांचा शिरकाव कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. गोव्यातील दारू आणि वाढते व्यसन यावर कडक निर्बंध आणून तरुणाईला योग्य दिशा देण्याचे आवाहन राणे यांनी यावेळी केले.
प्रशासनाला 'डेडलाईन'
- निधी अखर्चित का? याचा जाब अधिकाऱ्यांनी द्यावा.
- पारदर्शक प्रशासन: कामात चालढकल नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी.
- समन्वय: लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी 'एक कुटुंब' म्हणून काम करावे.
- पुढील ३ वर्षे: निवडणुका संपल्या असून आता केवळ विकासाची वाटचाल व्हावी.