दोषींवर कडक कारवाई करणार, सावंतवाडी कारागृहाची भिंत कोसळल्याने पालकमंत्र्यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:23 IST2025-07-05T16:20:00+5:302025-07-05T16:23:07+5:30
चौकशीसाठी वरिष्ठ अधिकारी येणार

दोषींवर कडक कारवाई करणार, सावंतवाडी कारागृहाची भिंत कोसळल्याने पालकमंत्र्यांनी दिला इशारा
सावंतवाडी : कारागृहाची इमारत हा ऐतिहासिक ठेवा होता. त्याला अनेक वर्षांपासून जपण्याचे काम करण्यात आले होते. पण तीन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावर भिंत बांधली त्यामुळे संपूर्ण संरक्षक भिंत कोसळली ही गंभीर बाब आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी लवकरच पाहणी करून त्याचा अहवाल देतील त्यानंतरच खऱ्या अर्थाने दोषी कोण हे समोर येईल. पण कोणीही दोषी असूदे त्याला सोडणार नाही. कडक कारवाई केली जाईल असा इशारा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
मंत्री राणे यांनी शनिवारी सावंतवाडी कारागृहाला भेट देत पडलेल्या भितीची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे, पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, बांधकामचे वैभव सगरे आदी उपस्थित होते.
..तर कोणाचीही गय नाही
राणे म्हणाले, घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र लवकरच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. त्यानंतर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी देऊन त्या इमारतीला गतवैभव प्राप्त करून देण्यात येणार आहे, असा शब्द राणे यांनी दिला त्यांनी सार्वजनिक बांधकामाच्या भूमिकेबाबत ही तीव्र नाराजी व्यक्त केली. भिंतीवर भिंत बांधताना ते बांधकाम टिकेल का? याचा अभ्यास होणे गरजेचे होते. फक्त बिले काढण्यासाठी जर हे काम झाले असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही.
जिल्हा नियोजनातून निधी देणार
भविष्यात उर्वरित बांधकामामुळे बांधकामाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी या कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. असे राणे म्हणाले,