मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत देणार : महादेव जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:18 IST2019-11-05T11:12:19+5:302019-11-05T11:18:24+5:30
देवगड येथील मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी तांबळडेग व कुणकेश्वर येथे मच्छिमारांना दिले.

मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांना कुणकेश्वर येथील रापण व्यावसायिकांनी निवेदन सादर केले.
देवगड : येथील मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी तांबळडेग व कुणकेश्वर येथे मच्छिमारांना दिले.
क्यार वादळ आणि अतिवृष्टीने झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री जानकर यांनी देवगड तालुक्यातील मिठबांव, तांबळडेग, कुणकेश्वर येथे मच्छिमारांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, बाळा खडपे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर, तहसीलदार मारुती कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. ढेकणे, गणपत गावकर, मिलिंद माने आदी उपस्थित होते.
तांबळडेग येथे मच्छिमारांनी समुद्राचे नस्त धोकादायक बनले असून किनारपट्टी भागाची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. स्मशानभूमीचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढावा व संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी मंत्री जानकर यांच्याकडे केली.
मिठबांव गजबादेवी मंदिराकडील होड्या काढण्यासाठी बांधलेल्या जेटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नव्याने जेटी बांधण्यात यावी अशी मागणी मच्छिमारांनी केली.
कुणकेश्वर येथे रापण व्यावसायिकांनीही जानकर यांच्याकडे क्यार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे निवेदन दिले.
शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छिमारांनी यावेळी केली. यावेळी विश्वास भुजबळ तसेच कुणकेश्वर, कातवण येथील मच्छिमार उपस्थित होते.