"कधीतरी थांबायला हवं..." भाजपा नेते नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत, समर्थकांसमोर झाले भावूक
By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2026 00:16 IST2026-01-05T00:16:19+5:302026-01-05T00:16:46+5:30
राणे विरुद्ध राणे असं पत्रकार लिहितात. आज आम्ही इथे स्टेजवर सगळे आहोत. कुटुंब एक आहे. कुणी काही अपेक्षा करत असेल तर ते कधीच होणार नाही. राणे एकसंघ राहतील असं नारायण राणे यांनी सांगितले.

"कधीतरी थांबायला हवं..." भाजपा नेते नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत, समर्थकांसमोर झाले भावूक
सिंधुदुर्ग - आज ३६ वर्ष राजकारणात झाली. आजपर्यंत एकही कार्यकर्ता माझ्यासमोर दारू किंवा सिगारेट पिऊन आला नाही. आज पैसे देऊन लोकांना बोलवले नाही. आज आपण चर्चा केली, एकमेकांशी बोललो. तुमच्याशी बोलून ठणठणीत झालो. माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करताय. माझ्याकडे आभार मानायला शब्द नाही. मी असेपर्यंत माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. दोघेही देणाऱ्यांपैकी आहेत. आमचे दुश्मन कुणी नाही. कधीतरी थांबायला पाहिजे. शेवटी शरीर आहे. दोन्ही चिरंजीव राजकारणात सक्रीय झाल्यानंतर आता कुणी व्यवसायही पाहायला पाहिजे असं विधान करत भाजपा खासदार नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
कणकवली येथे आज राणे समर्थकांचा मेळावा पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांसमोर भावूक झाल्याचे दिसून आले. नारायण राणे म्हणाले की, काही जणांना नारायण राणेंना संपवायचा आहे पण भल्याभल्यांना पुरून उरलोय. देशातील आणि बाहेरच्यांनी बरेच प्रयत्न केले पण माझ्या रामेश्वराची कृपा असेपर्यंत कुणी काही करू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून कुणी डगमगायचे नाही. वय किती होऊ दे, मागे कोण आहे, किती जण आहेत चिंता नको. आपण सक्षम आणि पुरेसे आहोत. माणूस बघा, माणसाचे कार्य पाहा. त्याला पैसे कमवण्याचा मार्ग दाखवा. आपला कोकण, आपला जिल्हा समृद्ध करा. आज हे कार्यकर्त्यांचे प्रेम बघून मी भारावून जातो. माझ्यासोबत ३५-३६ वर्ष कार्यकर्ते राहतायेत. माझ्यावर जीव लावतायेत. कार्यकर्ते पैशाने विकत घेतले नाहीत असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय हा मेळावा आयोजित करण्याची वेळ का आली, कुणामुळे आणि कशासाठी आली हे कळलं नाही. मी कधी काय म्हणालो नाही. मी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी म्हटलं होते, माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष.. त्यामुळे त्याबद्दल चर्चा करण्याची काही गरज नाही. परंतु माझा एक स्वभाव आहे. जगेन तर स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाही. मला ईश्वराने पदांसाठी जन्माला घातले का असा प्रश्न पडतो. एवढी पदे मला मिळाली आहेत. मी एका पदाचा दुरुपयोग केला का हे माझ्या विरोधकांनी किंवा कुणीही सांगावे. मी काळानुसार बदलत गेलो. परिस्थितीनुसार माझ्या विचारात, आचारात मी बदल केला. माझं ध्येय, स्वप्ने साकार करायची होती त्यामुळे मी बदलत गेलो. मी पदाची अपेक्षा करत नाही. मला कुठलेही पद नको असं हवं तर मी लिहून देईन. लोकसभा निवडणुकीपूर्वी मी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची वेळ मागितली आणि त्यांना भेटायला गेलो. तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका, मला व्यवसाय करायचा आहे असं त्यांना सांगितले. त्यावर राणेजी हम आपको छोडनेवाले नही असं त्यांनी उत्तर दिले. दोन्ही मुले राजकारणात आली, माझा व्यवसाय आहे असं सांगितले. त्यावर मुझे मालूम नही, आपको छोडेंगे नही असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले. मला पदाचा स्वार्थ नाही. सुरुवातीला वाटायचे. माझ्याकडे राजकारणातील दहा पदे मिळाली. केंद्रीय मंत्री, मंत्री आणि मुख्यमंत्रिपद मिळाले. १९९० साली जर कोकणाने निवडून दिले नसते तर हे काही शक्य नव्हते असं नारायण राणे यांनी म्हटलं.
दरम्यान, मी श्रीमंत घरात जन्माला आलो नाही. वयाच्या १५ व्या वर्षी मी शिवसेनेत आलो. १९८३ साली शाखाप्रमुख झालो ते पहिले पद, त्यानंतर लगेच वर्षभरात मी मुंबई महापालिकेत नगरसेवक झालो. त्यानंतर ३ वर्षांनी बेस्टचा अध्यक्ष झालो. मग १९९० साली एकेदिवशी मला मा. बाळासाहेबांनी बोलवले. रात्री ८ वाजले होते. विधानसभा निवडणुका आहेत तुला कोकणात जावं लागेल असं साहेब म्हणाले. त्यावर साहेब माझा जन्म कोकणात झाला परंतु कार्यक्षेत्र मुंबई आहे. मला कोकणात कुणी ओळखत नाही असं नको सांगितले. पण साहेब म्हणाले तुला जावे लागेल. मी दोन हात जोडले आणि नमस्कार करून बाहेर आलो. मी कोकणात आलो. मुंबईतून येताना अनेक विचार डोक्यात होते. मला संधी मिळाली तर जिल्ह्यात गरिबी ठेवणार नाही. मागासलेला जिल्हा ओळख होती ती पुसून टाकेन असं रामेश्वराकडे प्रार्थना केली. मी कुणाशीही उर्मटपणे वागणार नाही हे ठरवले. तुमच्या सर्वांच्या मेहनत, आशीर्वादाने मी आमदार झालो. नारायण राणे कोकणातून आमदार होईल कुणालाच वाटले नाही. आजही माझ्या निवडणुकीत स्वत:ला वाहून घेतले असे कार्यकर्ते आहेत अशी आठवण राणे यांनी सांगितली.
"कोकणात बरेच नेते येऊ पाहतायेत..."
मला एकदा शिवसेना पक्षाकडून सांगण्यात आले, पुण्यात IAS लोकांची व्याख्याने होतात तिथे प्रशासनावर व्याख्यान द्यायला जा. मी गेलो. जे काही तिथे बोललो. त्यानंतर आयएएस अधिकारी माझ्याभोवती उभे राहिले तुम्ही कुठून एवढे शिकला तेव्हा त्यांना मी वाचत असलेली पुस्तके दाखवली. मी कुठेही कमी पडलो नाही याचा अभिमान वाटतो. मला तुम्ही सिंधुदुर्गाचा नेता म्हणता, परंतु असे बरेच नेते आहेत, काही येऊ पाहतायेत. ९० साली जेव्हा मी इथे आलो तेव्हा प्यायला पाणी नव्हते, डोंगरी भागात रस्ते नव्हते. आज एवढी सर्व कामे मी केली. वाड्यावाड्यात डांबरी रस्ते दिले. जात-पात धर्म किंवा पक्षही काम करताना पाहिला नाही. कोकणातील कोणीही आला तरी त्याचे काम करून देतो. आजही मी फक्त खासदार आहे पण कार्यालयाबाहेर लोकांची रांग असते. हे करून दाखवले. त्यामुळेच हे पद असो किंवा नसो...आपण जिवंत आहोत तोपर्यंत या कोकणातील जनतेची सेवा करावी असं मला वाटते असं सांगत राणे यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातीलच नेत्यांवर निशाणा साधल्याचे बोलले जाते.
..सर्व निवडणुकीत पैसा वाटा, प्रचार करण्याची गरज नाही
आपल्याला जिल्ह्यासाठी आणि इथल्या माणसांसाठी काम करायचे आहे. १९९९ साली मुख्यमंत्री झालो तेव्हा मुंबईत एक परिषद घेतली. त्यात कोकणातील कुणी आयएएस, आयपीएस कोण आहे हात वर करा, त्यात एकही हात वर आला नाही. कोकणात हुशार मुले नाहीत का, आयएएस, आयपीएस, फॉरेन सर्व्हिस करणारी मुले नाहीत असा प्रश्न मला पडला. त्यानंतर मी सिंधुदुर्गात इंजिनिअर, मेडिकल कॉलेज काढले. किती पुढाऱ्यांनी काढले. शैक्षणिक क्षेत्रात किती पुढारी काम करतात ते सांगावे. राणे विरुद्ध राणे असं पत्रकार लिहितात. आज आम्ही इथे स्टेजवर सगळे आहोत. कुटुंब एक आहे. कुणी काही अपेक्षा करत असेल तर ते कधीच होणार नाही. राणे एकसंघ राहतील. राजकारण आहे, पक्ष वेगळे आहेत..मुख्यमंत्री असताना कोकणात २८ ब्रिज बांधले. हॉस्पिटल काढले, शैक्षणिक संस्था काढल्या. हे दुसरे कुणी केले? आज इथे बोलणाऱ्यांचे कार्य काय, पैसे देऊन आपलेसे करणे, सगळ्या निवडणुकीत पैसे वाटा, प्रचार करण्याची गरज नाही पण एक बरे झाले. आमच्या लोकांना कोटी कळायला लागले. ज्याला पाहिजे त्यांनी पैसे घ्या, माझ्यापासून दूर झाला तरी चालेल मला गुपचूप येऊन बातमी सांगा असंही नारायण राणे यांनी म्हटलं. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कणकवली येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राणे यांच्यातील छुपा संघर्ष असल्याचे समोर आले होते. त्यावरून नारायण राणेंनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले.