महामार्ग चौपदरीकरणसाठी साळीस्ते येथे रास्तारोको आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:45 IST2017-10-27T16:42:46+5:302017-10-27T16:45:50+5:30
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याच्या निषेधार्थ महामार्गावर कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन संबंधित जमीन मालकांनी कणकवली उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

महामार्ग चौपदरीकरणसाठी साळीस्ते येथे रास्तारोको आंदोलनाचा इशारा
तळेरे , दि. २७ : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याच्या निषेधार्थ महामार्गावर कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन संबंधित जमीन मालकांनी कणकवली उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. २ नोव्हेंबरपूर्वी या जमिनीचा मोबदला जमा न झाल्यास २ नोव्हेंबरला हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
साळिस्ते येथील गट क्र. ६७७ मधील हिस्सेदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथील गट क्र. ६७७ मधील या महामागार्ला गेलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. या जमिनीबाबत गजानन रघुनाथ पेंडूरकर यांनी हरकत घेतली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी हरकतीबाबत योग्य पुरावे सादर करण्यासाठी कळविण्यात आले.
मात्र दिलेल्या मुदतीमध्ये हरकतदार यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे उपविभागीय अधिका?्यांच्या पत्रानुसार हरकतदार यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही होणे अपेक्षित होते. तरीदेखील दोन महिने उलटून व वारंवार संबंधित कार्यालयात चौकशी करूनही याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याचे समजते.
यामुळे या गट क्रमांकामधील सुमारे ११५ हिस्से दारांचा मोबदला विनाकारण अडकून बसलेला आहे. याबाबत वेळोवेळी कणकवली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातहि विचारणा केली असता योग्य माहिती आम्हाला मिळत नसून केवळ दिरंगाई केली जात आहे.
शिवाय या कामाकरिता साळिस्ते सारख्या ग्रामीण भागातून कणकवलीला सातत्याने याचा पाठपुरावा करण्यासाठी जायला यायला आर्थिक व मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय याबाबत पुढे काय कार्यवाही झाली याबाबत सबंधित हिस्सेदारांना काहीही कळविण्यात आलेले नाही. यामुळे अनेक महिने या ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाच्या या गलथान व दिरंगाई कामाचा निषेध म्हणून याच राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी सबंधित सर्व विभागांना कळविण्यात आले आहे. २ नोव्हेंबरपूर्वी या जमिनीचा मोबदला न मिळाल्यास २ नोव्हेंबरला रास्ता रोको करण्यात येईल.