जलसीमेचा भंग, कर्नाटकातील नौका मालवण समुद्रात घेतली ताब्यात; मत्स्य विभागाची पहाटे धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:14 IST2025-09-25T16:12:50+5:302025-09-25T16:14:16+5:30

नौका जप्त करून आणली सर्जेकोट बंदरात

Violation of territorial waters Karnataka boat seized in Malvan sea | जलसीमेचा भंग, कर्नाटकातील नौका मालवण समुद्रात घेतली ताब्यात; मत्स्य विभागाची पहाटे धडक कारवाई

जलसीमेचा भंग, कर्नाटकातील नौका मालवण समुद्रात घेतली ताब्यात; मत्स्य विभागाची पहाटे धडक कारवाई

मालवण : मालवण सागरी किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रॉलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्याच्या सागरी हद्दीत घुसून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या अशा नौकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने भूमिका मांडली. त्या नंतर अनेक नौकांवर कारवाई झाली असून, सातत्याने मत्स्य विभागाकडून कारवाई सुरू आहे.

१० सागरी मैल पाण्यात आढळली

बुधवार २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मालवणसमोर अंदाजे १० सागरी मैल पाण्यात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहायय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) हे नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली किशन, रा. कुमठा उत्तर कानडा, राज्य कर्नाटक यांची नौका शिवतेजा नॉ. क्र.-आयएनडी-केए-२-एमएम-५९८० द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवणसमोरील समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या प्रतिवेदनानंतर नौकेबाबत सुनावणी

अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहायक मत्स्यविकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) यांनी पोलिस कर्मचारी गुरुप्रसाद परब तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक, मालवण व वेंगुर्ला यांच्या सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Violation of territorial waters Karnataka boat seized in Malvan sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.