Vengurla residents waiting for a well-equipped fish market | वेंगुर्लावासीयांना सुसज्ज मच्छीमार्केटची प्रतीक्षा

सध्या मानसीश्वर परिसरानजीक मासेविक्री सुरू आहे.

ठळक मुद्देवेंगुर्लावासीयांना सुसज्ज मच्छीमार्केटची प्रतीक्षाबाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा : विक्रेत्यांना मिळणार हक्काची जागा

प्रथमेश गुरव 

वेंगुर्ला : वेंगुर्ला बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मच्छीमार्केटचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना आपली हक्काची जागा आणि मत्स्य खवय्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मासे मिळणे सुलभ होणार आहे.

पूर्वीप्रमाणेच वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेलगतच हे मच्छी मार्केटचे काम होत असल्याने येथील नागरिकांसह व्यापारीवर्गही सुखावला आहे. मात्र, तोपर्यंत वेंगुर्ला बाजाराला मच्छीमार्केटची प्रतीक्षा आहे.

क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेल्या वेंगुर्ला बाजारपेठेत एकाच ठिकाणी भाजी, फळे, फुले, विड्याची पाने, किराणा माल, मासे यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सोनार, कासार, कपडे यांचीही दुकाने असल्याने वेंगुर्ला ही सर्वसमावेशक बाजारपेठ आहे.

एकदा या बाजारात प्रवेश केलेली व्यक्ती सामानाच्या बऱ्याच पिशव्या सांभाळत बाहेर येताना दिसते. वरील सर्व व्यवसाय हे एकमेकांवर अवलंबून आहेत. यात महत्त्वाचा वाटा आहे तो मासेविक्रीचा आणि खरेदीचा. त्यामुळे हे एकत्रितपणे सुरू होणे आवश्यक आहे.

मच्छी विक्री मैदानात

मच्छीमार्केट बांधकामावेळी मच्छी विक्रीची जागा बदलण्यात आली. त्यामुळे या बाजारपेठेत येण्यासाठी असलेल्या अनेक मार्गांपैकी काही मार्ग सुनेसुने झाले. तेथील वर्दळ कमी झाली. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी बरीच ठिकाणे बदलल्यानंतर आता श्री मानसीश्वरजवळील मैदानात ही मच्छीविक्री स्थिरावली आहे.

बाजारपेठेवर परिणाम

मच्छीविक्रीच एका बाजूला गेल्याने मुख्य बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका प्रामुख्याने पालेभाजी, विड्याची पाने, बेकरी उत्पादने, रिक्षा व्यावसायिक, हॉटेल्स, कोल्ड्रींक्स दुकाने आणि सुवर्णकार यांना बसला आहे. एकमेकांवर अवलंबून असलेले हे व्यवसाय असल्याने मच्छीविक्री महत्त्वाची आहे.


वेंगुर्ल्याचे नियोजित मच्छीमार्केट लवकरात लवकर होणे हे मच्छी विक्री महिलांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. प्रस्तावित मच्छी मार्केटची आम्ही पहाणी केली असून आम्हांला सुयोग्य अशी रचना तेथे होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
- श्वेता हुले,
मच्छी विक्रेती


मच्छीमार्केट ही वेंगुर्ल्याची एक शान आहे. सध्या सुसज्ज मच्छीमार्केट इमारतीचे काम सुरू आहे. लवकरच हे मार्केट सर्वांसाठी खुले होणार आहे. यामुळे शहरातील व्यापाराबरोबरच मच्छी विक्रेत्यांची गैरसोय, वाहतूक कोंडीचाही प्रश्न निकाली निघणार आहे.
- दिलीप गिरप,
नगराध्यक्ष

 

Web Title: Vengurla residents waiting for a well-equipped fish market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.