Sindhudurg: वेंगुर्ला शहराची पाणीटंचाईवर अखेर मात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:40 IST2025-04-29T17:40:10+5:302025-04-29T17:40:33+5:30
प्रथमेश गुरव वेंगुर्ला : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच ...

Sindhudurg: वेंगुर्ला शहराची पाणीटंचाईवर अखेर मात !
प्रथमेश गुरव
वेंगुर्ला : स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच पाण्याचा साठा कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. याचा परिणाम मुख्यत्वे करून हॉटेल व्यावसायिकांमध्ये जाणवत होता. परंतु, पाणीटंचाई मुक्त करण्याच्या घेतलेल्या ध्यासातून अखेर वेंगुर्ला शहर पाणीटंचाईमुक्त झाले आहे. गतवर्षीपासून शहरात पाणीटंचाई भासत नसल्याची माहिती नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.
गेली काही वर्षे वेंगुर्ला शहर पाणी टंचाईच्या संकटात सापडले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी याचा ताळमेळ साधणे म्हणजे प्रशासनाला एकप्रकारची डोकेदुखी ठरली होती. पाऊस पडेपर्यंत सर्वांना पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाणी कपात करणे गरजेचे बनले होते. त्यामुळे सुरुवातीला एक दिवस आड, त्यानंतर दोन दिवस तर पाऊस लांबणीवर जात असल्याचे लक्षात येताच तीन दिवस आड पाणीपुरवठा केला जायचा. पर्यटनाच्यादृष्टीने पाणी टंचाईच्या संकटावर मात करणे गरजेचे होते. दरम्यान, निशाण तलावाची अडीच मीटरने वाढवलेली उंची पाणीटंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरली.
तलावाची उंची वाढविल्याने जास्त प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक राहिला. त्याचबरोबरच पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या पाइपलाइन बदलण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाइपलाइनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाइपलाइनवरचे व्हाॅल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तसेच वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथे २०१७ पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून १ लाख लिटर पाण्याची टाकी व चंद्रभागा विहीर आदी कामे मंजूर करून ती पूर्णत्वासही नेली.
नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस
भविष्यात नारायण तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस असून यासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी शासनस्तरावर केली आहे. तर शहरातील दाभोली नाक्यापर्यंत आलेले तिलारीचे पाणी निमुजगा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या सर्व उपायांना यश आल्यास शहरात मुबलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे.
नवीन विंधन विहीर बांधली
अग्निशमन केंद्राजवळ २ लाख लिटर पाण्याची टाकी व विहीर, गाडीअड्डा येथील ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नवीन विंधन विहीर बांधण्यात आली. नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविली. आनंदवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली.
आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार
- विहिरी आणि बोअरवेल यांची साफसफाई, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्व कामांमुळे वेंगुर्ला शहर पाणीटंचाई मुक्त झाले आहे.
- वेंगुर्ला नगरपरिषद सद्यस्थितीत रोज १० लाख लिटर पाणी पुरवठा करीत आहे. १५ जूनपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
- पाऊस लांबणीवर गेल्यास आवश्यकतेनुसार तिलारीच्या पाण्याची मदत घेण्यात येणार आहे. शहरात एकूण १२५० नळधारक असून ९६ टक्के पाण्याच्या कराची वसुली करण्यात आली आहे.