अनधिकृत वाळू उपसा करणारी होडी पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:40 IST2020-06-20T16:39:22+5:302020-06-20T16:40:20+5:30
मालवण तालुक्यातील कोईल गावालगतच्या कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी महसूलच्या पथकाने धडक कारवाई केली. यात संक्शन पंप, लोखंडी पाईप व होडीमध्ये डिझेल ओतून आग लावून ती पेटवून देण्यात आली. तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.

अनधिकृत वाळू उपसा करणारी होडी पेटविली
मालवण : तालुक्यातील कोईल गावालगतच्या कालावल खाडीपात्रात अनधिकृतरित्या संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी महसूलच्या पथकाने धडक कारवाई केली. यात संक्शन पंप, लोखंडी पाईप व होडीमध्ये डिझेल ओतून आग लावून ती पेटवून देण्यात आली. तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.
कोईल गावात गेले काही दिवस मध्यरात्री वाळू उत्खनन वाहतुकीसाठी संक्शन पंप आणल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी पाहणी केली असता कोणतीही परवानगी नसताना खाडीपात्रात संक्शन पंप लावून वाळूचा उपसा होत असल्याने ग्रामस्थ संतप्त बनले.
काल काही ग्रामस्थांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार अनधिकृत संक्शन पंप व वाळू उपसा पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार पाटणे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी या महसूलच्या पथकाला दिले.
शुक्रवारी दुपारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी के. एच. पोकळे, तलाठी पी. डी. मसुरकर, टी. जी. गिरप, पोलीस पाटील रामचंद्र साटम यांच्या उपस्थितीत कोईल गावातील खाडीकिनारी महसूल पथकाने पाहणी केली. यावेळी एका लोखंडी होडीत संक्शन पंप व साहित्य तसेच सुमारे दोनशे मीटर अंतरावर लोखंडी पाईप दिसून आला. हा पाईप ज्या ठिकाणी होता त्या किनारी काही वाळू रॅम्प व मुख्य रस्त्याला जोडणारा कच्चा रस्ता होता. या ठिकाणाहून रात्री अनधिकृत उपसा केलेली वाळू ट्रक, डंपर सहाय्याने वाहतुकीचा मार्ग केला असल्याचे दिसून आले.
संक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली वाळू थेट किनारी आलेल्या डंपरमध्ये भरली जाते. त्यामुळे मनुष्यबळ वाचते. तसेच अवघ्या काही वेळेत डंपर भरला जातो. गेले काही दिवस मध्यरात्री वाळू उपसा सुरू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. तरी याप्रकरणी सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.