..तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही - नितेश राणे
By सुधीर राणे | Updated: September 20, 2024 15:16 IST2024-09-20T15:14:11+5:302024-09-20T15:16:38+5:30
महाविकास आघाडीत उद्धवसेना हा सावत्र भाऊ

..तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही - नितेश राणे
कणकवली: महाविकास आघाडीत उद्धवसेना हा सावत्र भाऊ झाला आहे. त्यामुळे त्या पक्षाची 'ना घरका ना घाटका'अशी अवस्था झाली आहे. काँग्रेस आणि तुतारी समोर कितीही नाक रगडले तरी उद्धव ठाकरे यांना या जन्मात तरी मुख्यमंत्री पद परत मिळणार नाही असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले, काँग्रेस समोर किती छाती फुगवली तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि तुतारीवाले उद्धवसेनेला किंमत देत नाहीत. लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेचा स्ट्राइक रेट सर्वात खराब आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या पात्रतेनुसारच बोलावे असाही सल्ला राणे यांनी दिला.
..त्यामुळे संजय राऊत जळत आहेत
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करताना गुजरातवर घसरणाऱ्या संजय राऊत यांचे पक्षप्रमुख गुजरातला जातात, गुजराती माणसाच्या लग्नात हजेरी लावतात. मात्र, राऊत यांना सोबत नेत नाहीत. त्यांची कोणाशी ओळख करून देत नाहीत. त्यामुळे संजय राऊत जळत आहेत. त्यांना हे खटकते. त्यामुळे गुजराती लोकांवर संजय राऊत उठसूठ टीका करत असल्याचेही राणे म्हणाले.