‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:09 IST2024-12-13T18:08:28+5:302024-12-13T18:09:12+5:30

भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश होतील?

Uddhav Sena office bearers worried about political career | ‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

प्रकाश काळे

वैभववाडी : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे कवित्व संपले असून, जेमतेम महिनाभरातच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजेल. त्यादृष्टीने तालुक्यात भाजपने तयारी सुरू केली आहे. मात्र, महाविकास आघाडी विशेष म्हणजे उद्धवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर राजकीय ‘करिअर’चा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांची अवस्था ईकडे ‘आड’ आणि तिकडे ‘विहीर’ अशीच काहीशी झालेली दिसत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला टक्कर देणे सोडाच ‘मविआ’ ९ उमेदवार तरी देऊ शकेल का? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.

राज्याने विधानसभा निवडणुकीत राजकीय त्सुनामीचा अनुभव घेतला. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत ‘बाहुबली’ ठरलेल्या ‘मविआ’चा महायुतीने काटाच काढला. हा धक्का राजकीय धुरिणांनाही पेललेला नाही. अशातच आता कार्यकाल संपलेल्या महानगरपालिका, नगरपरिषदांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे विधानसभा निकालाच्या वातावरणाचा महायुतीला फायदा उठवायचा असल्याने विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तत्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.

महाविकास आघाडीतील उद्धवसेना सोडली तर काँग्रेस कुठेतरी ‘बॅनर’वर दिसते. तिलाही गटबाजीने ग्रासले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) फक्त नावापुरती आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांशी ‘खासगी’त संवाद साधताना ‘उमेदवार आमचा कुठे आहे? उद्धवसेनेचा आहे, आमच्या हातात आहे काय?’ अशी काही ठिकाणी मित्रपक्षांची भूमिका होती. त्यामागची कारणे त्यांनाच माहीत असतील. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात या दोन्ही मित्र पक्षांकडे मतांच्या आशेने पाहणे म्हणजे उद्धवसेनेचा आत्मघात ठरणार, हे मात्र स्पष्ट आहे.

भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश होतील?

संघटनात्मकदृष्ट्या भाजप मजबूत आहेच. शिवाय विधानसभेच्या निकालानंतर आणखीच उत्साहाला भरती आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडे प्रत्येक ठिकाणी तीन-चार जण इच्छुक किंवा दावेदार आहेत. त्यांना सावरण्याची कसरत करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत ‘पॉलिटिकल करिअर’साठी पक्षात येऊ पाहणाऱ्या ‘मविआ’तील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जागा करणार कुठे, हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ‘विनाअट’ सुखाने नांदण्यासाठी जे येतील किंवा ज्यांचे राजकीय उपद्रवमूल्य संपवायचे आहे, अशांनाच भाजप सामावून घेईल, असे सध्याचे चित्र आहे.

उमेदवारी घेऊन करणार तरी काय?

मागील सात-आठ महिन्यात झालेल्या दोन निवडणुकीत ‘मविआ’ने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोळपे, कोकिसरे व लोरे या तिन्ही मतदारसंघात सपाटून मार खाल्ला. यांतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या सहाही गणांची अवस्था तीच आहे. तग धरता येईल, अशी परिस्थिती कुठेही राहिलेली नाही. आर्थिक विवंचना तर निराळीच! मग या बुडत्या जहाजात आणखी थांबणार तरी का? आणि कशासाठी? अशा स्वरुपाचे नैराश्य उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पसरले आहे.

रात्री झोपताना उद्धवसेनेत, सूर्योदयाला महायुतीत ?

भाजपने सगळीकडेच उद्धवसेनेला नेस्तनाबूत करण्याची मोहीम उघडली आहे. मात्र, भाजपमध्ये झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन गुदमरण्यापेक्षा त्यांच्याच मित्रपक्षांचे बोट धरून किमान ‘राजकीय ओळख’ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्री झोपताना उद्धवसेनेत असणारे सूर्योदयाला महायुतीत दिसले तर नवल वाटायला नको. अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही उद्धवसेना वरिष्ठ पातळीवरून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता छळू लागली आहे.

Web Title: Uddhav Sena office bearers worried about political career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.