कुणकेश्वर यात्रेसाठी निघाले असता काळाचा घाला, कारच्या धडकेत एक जण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:52 IST2022-03-02T15:52:11+5:302022-03-02T15:52:36+5:30
शिरगाव: कुणकेश्वर यात्रेसाठी काका-पुतणे दुचाकीवरुन निघाले असता कारने दिलेल्या धडकेत काकाचा जागीच मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी झाला. ...

कुणकेश्वर यात्रेसाठी निघाले असता काळाचा घाला, कारच्या धडकेत एक जण जागीच ठार
शिरगाव: कुणकेश्वर यात्रेसाठी काका-पुतणे दुचाकीवरुन निघाले असता कारने दिलेल्या धडकेत काकाचा जागीच मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी झाला. सुधीर पांडुरंग लब्दे (वय-४७) असे मृताचे नाव आहे. तर, अमोल संजय लब्दे (२४) असे जखमीचे नाव आहे. वरेरी मसरण येथे काल, मंगळवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड तालुक्यातील शिरगाव आंबेखोल येथील अमोल लब्दे हा दुचाकीवरून काका सुधीर लब्दे यांना घेऊन शिरगावहून कुणकेश्वर यात्रेसाठी निघाला होता. दरम्यान कुणकेश्वरहून कणकवलीच्या दिशेने निघालेल्या कारची वरेरी मसरण येथे त्यांच्या दुचाकीला समोरुन धडक झाली.
यात सुधीर लब्दे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोल लब्दे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. शिरगाव येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची फिर्याद संतोष लब्दे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद डगरे, राजन जाधव, आशिष कदम, विशाल वैजल करीत आहेत.
रस्त्याची साईडपट्टी अपघाताला कारणीभूत
लिंगडाळ तिठा येथून कुणकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वरेरी मसरण दरम्यान रस्त्याची एका बाजूने कडा तुटलेली आहे. त्यामुळे रस्ता आणि साईडपट्टी यामध्ये अंतर निर्माण झाले आहे. हेच रस्ता आणि साईड पट्टी यांच्यामधील अंतर लहान वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रेपूर्वी लक्ष देणे आवश्यक होते अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत होत्या.