Sindhudurg: चौकुळ येथे मृत हरणासह दोन शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले, वनविभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:58 IST2025-12-19T13:57:39+5:302025-12-19T13:58:19+5:30
मृत हरीण, काडतुसाच्या बंदुकीसह चार काडतुसे जप्त

Sindhudurg: चौकुळ येथे मृत हरणासह दोन शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले, वनविभागाची कारवाई
आंबोली : सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथे दोन शिकाऱ्यांना बुधवारी (दि. १७) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक मृत हरीण, काडतुसाची बंदूक आणि चार जिवंत काडतुसांसह रंगेहाथ पकडण्यात आले. आंबोली येथील वनविभागाच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या दोघांना गुरुवारी सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी ठोठावली आहे.
आंबोली वनविभागाचे कर्मचारी चौकुळ-केगदवाडी रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गस्तीसाठी फिरत होते. त्यांना एक संशयित दुचाकी (एमएच ०७ एक्यू ०८९१) ही आढळून आली. त्या दुचाकीवरील तुषार विजय गुंजाळ (वय ३८, रा. कुपवडे, वसोली, ता. कुडाळ) व परशुराम संजय राऊळ (२७, रा. देऊळवाडी, मळगाव, ता. सावंतवाडी) या दोघांना थांबवून माहिती घेतली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या.
त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एक मृत पिसई जातीचे हरीण व एक नळी असलेली काडतुशी बंदूक तसेच चार जिवंत काडतुसे आढळून आल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चौकुळ, वनरक्षक मासुरे, वनरक्षक केगदवाडी यांनी केली. या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची वनकोठडी मिळाली आहे.
वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदेंची दुसरी धडक कारवाई
आंबोलीत नवनियुक्त झालेल्या वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांचीही शिकारी पकडण्याची ही दुसरी धडक कारवाई आहे. यासाठी त्यांचे परिसरातून व निसर्गप्रेमींतून कौतुक होत आहे. आंबोली, नांगरतास, चौकुळ या जंगलमय भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिकार चालते. त्यामुळे अशा प्रकारच्या गस्त रात्री नेहमीच चालू ठेवल्या पाहिजे, अशी मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे.