Sindhudurg: खारेपाटण येथे दुचाकी-कंटेनरची समोरासमोर धडक, दोघे ठार
By सुधीर राणे | Updated: December 12, 2024 16:11 IST2024-12-12T16:10:48+5:302024-12-12T16:11:06+5:30
संतोष पाटणकर खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली तालुक्यातील खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर काल, बुधवारी रात्री दुचाकी-कंटेनरची समोरासमोर ...

Sindhudurg: खारेपाटण येथे दुचाकी-कंटेनरची समोरासमोर धडक, दोघे ठार
संतोष पाटणकर
खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली तालुक्यातील खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर काल, बुधवारी रात्री दुचाकी-कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार सचिन एकनाथ लाड (वय-३५, रा. हसोळ तळी, राजापूर) हा जागीच ठार झाला. तर तानाजी वामन शेळकर (३०, रा. कोडवशी,राजापूर शिळकरवाडी) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले असता तो मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
हासोळ येथील दुचाकीस्वार दुचाकी क्रमांक (एम.एच.०८ एक्स- ४२५२) घेऊन खारेपाटण येथे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आला असता खारेपाटण बॉक्सवेल ओव्हर फ्लाय ब्रिजवर चूकीच्या बाजूने जात असल्याने कणकवलीच्या दिशेने आलेला व मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर वाहन (क्रमांक एम. एच.४६ सी. एल. ३१५८) याची समोरासमोर धडक झाली. त्यात सचिन लाड जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला तानाजी शेळकर हा गंभीर जखमी झाला होता. त्याला १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार माने व मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले. तर कणकवली येथून पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, हवालदार देसाई यांनी खारेपाटण येथे अपघात स्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली.अधिक तपास खारेपाटण पोलिस करत आहेत.