करुळ घाटमार्गे वाहतूक शनिवारपासून सुरू होणार, दरडी हटविणे अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:12 IST2025-09-12T18:11:10+5:302025-09-12T18:12:04+5:30
मोठे दगड रस्त्यावर आल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती

संग्रहित छाया
वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : करुळ घाटातील सहापैकी पाच ठिकाणच्या दरडी हटविण्यात आल्या आहेत. तर एका ठिकाणची दरड हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर शनिवार, दि. १३ रोजी करुळ घाटमार्गे वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
करूळ घाटातील ‘यू’ आकाराच्या वळणावर ४ सप्टेंबरला मोठी दरड कोसळली. मोठे दगड रस्त्यावर आल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती; परंतु प्रशासनाने घाटरस्त्यांची पाहणी केल्यानंतर या घाटमार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थिती आढळली. कोणत्याही क्षणी कोसळतील अशी काही ठिकाणे निदर्शनास आली.
याशिवाय ज्या ठिकाणी दरड कोसळली होती. त्याच ठिकाणी आणखी दरड कोसळण्याच्या स्थितीत होती. त्यामुळे वाहतुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार, दि. १२ सप्टेंबरपर्यंत करुळ घाटमार्ग वाहतुकीस बंद केला होता. दरड हटविण्याचे काम शुक्रवार दुपारपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरपासून करुळ घाटमार्गे वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.