Sindhudurg: करुळ घाटात वळणावर कंटेनर बंद पडला, तासभर झाली होती वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:22 IST2025-06-05T18:22:12+5:302025-06-05T18:22:58+5:30
पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली

Sindhudurg: करुळ घाटात वळणावर कंटेनर बंद पडला, तासभर झाली होती वाहतूक ठप्प
वैभववाडी : करुळ घाटातील शेवटच्या यू आकाराच्या वळणावर कंटेनर बंद पडल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. त्यामुळे घाटरस्त्यात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ३) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला.
तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वैभववाडी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी ट्रेलरला आग लागल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गगनबावड्याकडून वैभववाडीकडे येत असलेला कंटेनर घाटरस्ता उतरत असताना यू आकाराच्या वळणावर बंद पडला.
रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रात्री मोठ्या प्रमाणात या मार्गावरून आराम बस ये-जा करतात. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाटातील वाहतूक ठप्प झाल्याचे समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस कर्मचारी रणजित पाटील, सूरज पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ जेसीबी बोलावून बंद पडलेला कंटेनर बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. घाटरस्त्यात शेकडो वाहने तासभर अडकली होती.