पावसाचे पाणी साचून चौपदरीकरणांतर्गत कामांचे तीन-तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:37 IST2020-06-05T16:36:46+5:302020-06-05T16:37:56+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत.

कसाल महामार्गावरील एसटी बस स्टॅडसमोरील पुलाखालील सर्व्हिस रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे.
ओरोस : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत.
कसाल स्टँडसमोरील पुलाजवळ सर्व्हिस रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्ता चिखलमय बनला. याचा त्रास वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागला. यामुळे पहिल्या पावसात चौपदरीकरणांतर्गत कामांचे तीन-तेरा वाजले, तर पुढे पावसाळ्यात काय होणार? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.
कसाल शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, गेली दोन वर्षे चौपदरीकरणांतर्गत पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाही यावर्षी पावसाळ्याआधी ठेकेदार कंपनी, प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पहिल्याच पावसात चौपदरीकरण कामाला फटका बसला आहे.
कसाल एसटी स्टँडसमोरील पुलाखाली रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून येथे दुचाकी अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी येथे सर्व्हिस रस्त्यावर पुलाखाली पाणीच पाणी झाले. हा रस्ता पाण्याखाली गेला असून चिखलमय झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे.