फंडपेट्या फोडणारा सराईत चोरटा जेरबंद, २३ हजारांची रक्कम हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:12 IST2020-06-12T15:10:17+5:302020-06-12T15:12:54+5:30
मंदिरातील दानपेटी उचकटून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून २३ हजार ३३६ रुपये रक्कमही हस्तगत केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.

फंडपेट्या फोडणारा सराईत चोरटा जेरबंद, २३ हजारांची रक्कम हस्तगत
सिंधुदुर्ग : मंदिरातील दानपेटी उचकटून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून २३ हजार ३३६ रुपये रक्कमही हस्तगत केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली.
मालवण येथील श्री देवी भद्रकाली मंदिरातील दानपेटी उचकटून त्यातील ७ हजार ५०० रुपये एवढी रक्कम अज्ञात चोरट्याने २५ मे रोजी चोरून नेली होती. तसेच मालवण धामापूर येथील भगवती मंदिरातील दानपेटी फोडून १७ हजारांची रोख रक्कम व साहित्य चोरून नेले होते. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला होता.
त्यानुसार काही पथके नेमून संशयिताचा तपास सुरू असतानाच सावंतवाडी येथील कोलगाव येथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याची चौकशी केली असता तो संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर वरील दोन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेली २३ हजार ३३६ रक्कम सापडली.
त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन मालवण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस कर्मचारी सुधीर सावंत, अनिल धुरी, प्रवीण वालावलकर यांनी केली.