'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:30 IST2025-11-08T14:28:31+5:302025-11-08T14:30:12+5:30
Narayan Rane Eknath Shinde: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार की नाही, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण, दोन्ही जिल्ह्यात युती होईल, असे नारायण राणे यांनी स्पष्ट करतानाच शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट इशारा दिला.

'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
Narayan Rane Mahayuti: "सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात युती होईल. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत राणे कुटुंबात कोणताही वाद होणार नाही. मी दोन्ही पक्षाच्या (शिवसेना-भाजप) कार्यकर्त्यांना बोलावलं. गप्पा झाल्या. सगळ्यांची इच्छा आहे युती व्हावी आणि युती होईल", असे स्पष्ट करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला युती तोडण्याचाही इशारा दिला. राजन तेलींच्या मुद्द्यावरून ते भडकले.
नारायण राणे यांची सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद झाली. राणे म्हणाले, "आता निवडणुका आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काही झालं तरी आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे. बैठक होईल आणि अंतिम निर्णय घेतील. मला वाटतं की युती व्हावी. दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा."
"मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाहीत"
"काही लोक राणे कुटुंबाबद्दल बातम्या पुरवत आहेत. मी एवढंच सांगेन की गोष्टींची शहानिशा करा आणि बातम्या द्या. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही. वाद होऊ देणार नाही. राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही. मी ३५ वर्षे जिल्ह्यात राजकारण केले. मी दोन्ही पक्षाच्या (शिवसेना-भाजप) कार्यकर्त्यांना बोलावलं. गप्पा झाल्या. सगळ्यांची इच्छा आहे युती व्हावी आणि युती होईल", असे नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांना शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा आहे. त्याला राजन तेली यांनीही दुजोरा दिला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला.
राणे म्हणाले, "माझं मत आहे की, तसं ठरलं आहे तर आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात संबंध तोडू. राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाहीये. मी मानत नाही. दोन माणसांना मी भाजपशी संबंधित मानत नाही. विशाल परब आणि राजन तेली. यांचं कोणतंही म्हणणं मी ग्राह्य धरणार नाही आणि याला विरोधच करेन."
एकनाथ शिंदे का टाकलेल्यांना जमा करतोय? नारायण राणे
"प्रतिष्ठित नागरिकांमध्ये स्वतः राजन तेली येत नाही. स्वतःला प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेले एकनाथ शिंदे का जमा करतोय माहिती नाही. मी भेटल्यानंतर सांगेन. विशाल परब त्याचे ऑफिस कसं, कोणतीही मोठा नेता आहे असं. त्याने भाजपवर कमी टीका केलेली नाहीये ना? तो मला भेटू दे. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला, तरी... तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. त्याला वाचवायला कोणीही येऊ दे", अशी धमकी नारायण राणेंनी दिली.