Sindhudurg: पार्टी जिवावर बेतली, मित्रानेच केला मित्राचा खून; मुख्य संशयित ताब्यात
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 12, 2024 17:14 IST2024-12-12T17:12:24+5:302024-12-12T17:14:29+5:30
२४ तासांत पोलिसांकडून घटनेचा छडा

Sindhudurg: पार्टी जिवावर बेतली, मित्रानेच केला मित्राचा खून; मुख्य संशयित ताब्यात
बांदा : पार्टीत झालेल्या वादातून खुर्ची डोक्यात मारल्यामुळे भालावल-फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर (वय ४८) या तरुणाचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. बुधवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मुख्य संशयित चेतन रवींद्र परब (३५, भालावल) याला सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली, तर पार्टीत सहभागी असलेल्या अन्य सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.
याबाबत मृत संतोष यांचा पुतण्या नितीन महेश गुळेकर यांनी बांदा पोलिसात तक्रार मंगळवारी दिली. मृताचे घर व ज्याठिकाणी पार्टी झाली ते ठिकाण अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले व उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत संपूर्ण दिवस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी संतोष याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरीत्या आढळला होता. बुधवारी सकाळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी मृतदेहाचे विच्छेदन केले. यामध्ये मृताच्या डोक्यावर डाव्या बाजूला खोलवर गंभीर वार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संतोष याचा खूनच झाल्याची पुष्टी मिळाली. त्यानंतर बांदा पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरविली.
अन्य सहा जणांची नावे उघड
बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ भालावल येथे दाखल झाले. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेक्षणचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, बांदा पोलिस पथक यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मुख्य संशयित चेतन परब याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. त्याने आपणच मृताला दारूच्या नशेत प्लास्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केल्याची प्राथमिक कबुली पोलिसांना दिली. यावेळी आपल्यासोबत रविवारी अन्य सहा जण पार्टीत सहभागी असल्याची माहिती दिली, तसेच त्यांची नावे चौकशीत उघड केली.
पोलिसी खाक्या दाखविताच दिली माहिती
मुख्य संशयिताने दिलेल्या माहितीनुसार बांदा पोलिसांनी सहाही जणांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले. सुरुवातीला ते संदिग्ध माहिती देत होते. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पार्टीत घडलेली सविस्तर माहिती दिली. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
पार्टीत झाली मारामारी
रविवारी भालावल येथे मुख्य संशयित चेतन यांच्या निवासस्थानी पार्टीसाठी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हे सर्व जण एकत्र आले होते. पार्टी मद्याचा समावेश असल्याने पार्टी उत्तरोत्तर रंगत गेली. यावेळी संशयित चेतन व मयत संतोष यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. चेतन याने संतोषला प्लास्टिक खुर्चीच्या साहाय्याने मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यावर खुर्चीचा जोरदार प्रहार केला. यामध्ये तो विव्हळला. त्याने जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याच्या बेतात असताना तो घराच्या मागील पडवीत जाऊन कोसळला. त्यानंतर सर्वानी तेथून पोबारा केला. त्यानंतर संतोष हा आपल्या घरात मंगळवारी मृतावस्थेत आढळला.
मृत संतोष हा संशयितच्या घरी कोसळला तर त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी कसा सापडला हे गूढ उकलण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे. त्याच्या मृत्यूस अन्य कोणी कारणीभूत आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.