मालवण : तालुक्यातील रेवंडी खाडीकिनारी वाळू उपसा करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या नौकेतून आलेल्या काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. १९) रात्री घडली होती. यात जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडलेल्या एका वाळू कामगाराचा मृतदेह मंगळवारी (दि. २१) सकाळी शेलटी खाडीकिनारी आढळून आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तळाशील येथील पाचजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयितास पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य चारजणांचा शोध सुरू आहे.गेले काही दिवस तळाशील खाडीत पात्रात वाळू उपसाप्रकरणी स्थानिक ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. यात रविवारी रात्री रेवंडी खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या होडीत असलेल्या पाच कामगारांवर एका छोट्या होडीतून आलेल्या तळाशील येथील काही जणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात एक वाळू कामगार जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडून बेपत्ता झाला होता. गेले दोन दिवस त्याचा शोध घेण्यात येत होता.
यात मंगळवारी सकाळी शेलटी खाडीकिनारी त्या वाळू कामगाराचा मृतदेह सापडून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक जी. जी. माने, सुहास पांचाळ, हेमंत पेडणेकर, सुशांत पवार यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखलहल्लाप्रकरणी विकास विलास चेंदवणकर (रा. रेवंडी तांडेलवाडी) यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार रात्री संशयित आरोपी ललित देऊलकर (३०), तेजस सादये (२६, दोन्ही रा. तोंडवळी तळाशील) यांच्यासह अन्य तिघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी ललित देऊलकर याला पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर अन्य चारजणांचा शोध सुरू आहे. संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.