Sindhudurg: बाबासाहेबांच्या गुरुवर्यांच्या आठवणी जन्मगावी जतन व्हाव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:15 IST2025-04-01T14:14:51+5:302025-04-01T14:15:37+5:30

सावळाराम भराडकर वेंगुर्ला : मराठीतील आद्य शिवचरित्रकार गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शालेय जीवनात ...

The memories of Guru Krishnarao Arjun Keluskar, whom Dr. Babasaheb Ambedkar considered as his Guru should be preserved in his birthplace | Sindhudurg: बाबासाहेबांच्या गुरुवर्यांच्या आठवणी जन्मगावी जतन व्हाव्यात!

Sindhudurg: बाबासाहेबांच्या गुरुवर्यांच्या आठवणी जन्मगावी जतन व्हाव्यात!

सावळाराम भराडकर

वेंगुर्ला : मराठीतील आद्य शिवचरित्रकार गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शालेय जीवनात भेट म्हणून दिलेले स्वलिखित गौतम बुद्धांचे चरित्र बाबासाहेबांच्या जीवनात प्रेरणादायी ठरले. डॉ. बाबासाहेबांनी गुरूस्थानी मानलेल्या गुरूवर्य केळूसकर यांचे वास्तव्य असलेले वेंगुर्ला तालुक्यातील केळूस हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. त्यांच्या आठवणींचा ठेवा म्हणून केळूस गावाचे ऐतिहासिक दृष्ट्या जतन होणे गरजेचे असताना, शासनाला मात्र त्यांच्या जन्म गावाचा विसर पडल्याचे दिसत आहे.

मराठीतील चरित्रलेखक, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे २० ऑगस्ट १८६० साली झाला. केळूस गावी तारादेवी मंदिरानजीक त्यांचे वास्तव्य होते. स्वांतत्र्यपूर्व काळातील एका झाडाखाली भरवल्या जाणाऱ्या शाळेत त्यांनी काही काळ शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते  मुंबईला आले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या केळूसकरांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती, मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना लवकरच शिक्षण सोडून नोकरी  पत्करावी लागली. सुरुवातीला डोंगरी भागातील इस्रायली शाळेत आणि नंतर विल्सन हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापन केले.

केळूसकर यांनी १८९८ साली स्वत: लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शालेय जीवनात भेट म्हणून दिले होते. ते चरित्र बाबासाहेबांच्या जीवनात प्रेरणा देणारे ठरले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब केळूसकर यांना आपल्या गुरूस्थानी मानले होते, असा उल्लेख धनंजय कीर यांनी लिहिलेल्या केळूसकरांच्या चरित्रात मिळतो. तसेच, त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चरित्रग्रंथाच्या पहिल्या खंडातही असाच उल्लेख असून, इतरही लेखकांनी असे  लिखाण केले आहे.

गुरूवर्य कृष्णराव केळूसकर यांचे वर्णन धनंजय कीर यांनी ‘ऋषितुल्य प्रज्ञावंत’ असे केले आहे. त्यांचे वास्तव्य असलेले केळूस गाव जिल्ह्यासाठी भूषण असून, या गावाचे ऐतिहासिकदृष्ट्या जतन होणे गरजेचे आहे. पण, आज तेथे त्यांच्या घराचे अवशेषही बाकी नाहीत, हे दुर्दैव आहे. शासनाने तेथे त्यांचे स्मारक बांधण्याची मागणीही केळूसवासीयांतून होत आहे. शासनाला मात्र याचा विसर पडल्याने हे गाव दुर्लक्षित राहिले आहे.

केळूसकरांच्या पुस्तकावर बाबासाहेबांची प्रतिक्रिया

गुरूवर्य केळुसकर लिखित ‘गौतम बुद्धांचे चरित्र’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉ. बाबासाहेबांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘दादा केळूसकरांनी मला त्यांच्या बुद्धांच्या चरित्राचे पुस्तक दिले.  हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला’ असा उल्लेख त्यात केला आहे.

गुरूवर्य केळूसकर यांनी लिहिलेली चरित्रे

गुरूवर्य केळूसकर यांनी एल्लाप्पा बाळाराम, गुणाजीराव घुले, स्वामी गोविंद जनार्दन बोरकर, जनाबाई रोकडे, माधवराव रोकडे, म्यूर मॅकेंझी, रामचंद्र विठोबा धामणस्कर, गौतम बुद्ध व तुकाराम महाराज यांच्यावरील चरित्र ग्रंथांबरोबरच केळूसकरांनी क्षत्रियकुलावंतस  छत्रपती शिवाजी महाराजांचेही पहिले समग्र चरित्र ‘छत्रपती शिवाजी महाराज’ १९०७ साली प्रसिद्ध केले. सान्वय सार्थ सटीक श्रीमद्भागवतगीता हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. तसेच ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबलचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे.

शासनाचे प्रयत्न गरजेचे

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरूवर्य केळूसकर यांच्या नावाने राजमार्ग जातो. हा केळूस गावचा अभिमान आहे. केळूस गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी गुरूवर्य केळूसकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. डॉ. बाबासाहेब आबेडकरांची स्मारके राज्यात ठिकठिकाणी आहेत. तसेच, स्मारक गुरूवर्य कुष्णराव केळूसकर यांच्या जन्मगावी केळूस येथे होण्यासाठी सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी व शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गुरूवर्य कुष्णराव केळूसकर यांचे जन्मगावी  स्मारक होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, केळूस येथे जीर्ण असलेली शाळा पुनर्जीवित करून त्याठिकाणी गुरूवर्यांच्या आठवणी चिरंतर राहण्यासाठी आपण प्रस्ताव सादर केला आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी शासनाचे सहकार्य खूप गरजेचे आहे. - योगेश शेटये,  सरपंच, केळूस ग्रामपंचायत.

Web Title: The memories of Guru Krishnarao Arjun Keluskar, whom Dr. Babasaheb Ambedkar considered as his Guru should be preserved in his birthplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.