Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:07 IST2025-08-08T12:06:46+5:302025-08-08T12:07:39+5:30

काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इतिहासप्रेमींमधून स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली होती

The main entrance gate of Vijaydurg Fort will be changed | Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा बदलणार

Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा बदलणार

देवगड : विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले प्रत्येकी एक-एक टनाचे दरवाजे इतिहास संदर्भाशी मिळते जुळते नसल्याने अखेर काढण्यात येणार असल्याचे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे विजयदुर्ग उपमंडळ संरक्षक सहायक राजेश दिवेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

या दरवाजाची बांधणी आणि वापरलेले कोवळे लाकूड यासंदर्भात विजयदुर्ग ग्रामपंचायत, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग विभाग), गडकिल्ले संवर्धन संस्था (कोकण विभाग) या सर्वांनीच संताप व्यक्त करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. ''आर्कोमो'' कंपनीने हा दरवाजा विजयदुर्ग किल्ल्यासाठी बनविला होता. मात्र, इतिहासप्रेमी संघटना आणि अनेक व्यक्तींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने आर्किमो कंपनीला हा दरवाजा काढून ऐतिहासिक संदर्भाशी मिळताजुळता दरवाजा आणि तत्कालीन पूरक दरवाजा नव्याने बनविण्यात यावा, असे सांगण्यात आले.

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला काही दिवसांपूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने लाकडी दरवाजे बसविले. या लाकडाचा दर्जा आणि बांधणी निकृष्ट दर्जाची असल्याने यासंदर्भात विजयदुर्ग विभागाला कळविण्यात यावी, असे प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते.

विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाची पाने चाळताना काही संदर्भ हाती लागले. यामध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर शेवटचे युद्ध झाले ते १७५६ साली. तुळाजी आंग्रे विरुद्ध इंग्रज आणि पेशवे या लढाईत तुळाजी आंग्रेनी माघार घेतली. त्यानंतर सहा महिने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता. हा किल्ला पुन्हा पेशव्यांच्या ताब्यात आला आणि १८१८ पर्यंत विजयदुर्ग किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. आनंदराव धुळप त्यावेळी आरमार प्रमुख होते. १८१८ नंतर हा किल्ला कृष्णराव धुळपांकडे गेला. त्यावेळीही नौदल होते.

इतिहासप्रेमींमधून स्पष्ट नाराजी

दरम्यानच्या काळात या मुख्य दरवाजाचे काही नुकसान झाले असेल तर त्यावेळी धुळपांनी त्याची डागडुजी केली होती. म्हणजेच १८१८ नंतर इंग्रजांनी पेशव्यांकडून हा पुन्हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे काही अवशेष होते. दोनशे वर्षांपूर्वी या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची दुरवस्था व्हायला सुरुवात झाली होती. मात्र, २०० वर्षांनंतर काही दिवसांपूर्वीच हा दरवाजा नव्याने बसविण्यात आला होता; पण त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इतिहासप्रेमींमधून स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Web Title: The main entrance gate of Vijaydurg Fort will be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.