Sindhudurg: रस्त्याची दुरुस्ती, तिलारी घाट आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:24 IST2025-02-04T13:23:36+5:302025-02-04T13:24:09+5:30
तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत एसटी व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता

Sindhudurg: रस्त्याची दुरुस्ती, तिलारी घाट आजपासून वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग..जाणून घ्या
दोडामार्ग : तिलारी घाटाच्या डागडुजीसाठी सोमवारपासून घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. घाटातील तुटलेले संरक्षक कठडे आणि जयकर पॉइंट येथील खचलेल्या रस्त्याची डागडुजी हाती घेण्यात आली असून, ती महिनाभरात पूर्ण होणार आहे.
तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत एसटी व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, एसटी वगळता इतर अवजड वाहनांची वाहतूक राजरोसपणे तिलारी घाटातून सुरू होती. दरम्यान, घाटातील जयकर पॉइंट येथे अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग खचला. एसटी बंद झाल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. घाटातून एसटी पुन्हा सुरू व्हावी यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, कोदाळी माजी सरपंच अंकुश गावडे व स्थानिक ग्रामस्थांनी विविध आंदोलन, उपोषण केले.
स्थानिकांचा प्रशासनाविरोधात वाढता उद्रेक पाहता एसटी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे बनले. त्यामुळे प्रशासनाने घाटातून एसटी उतरवून प्रात्यक्षिकही घेतले. यावेळी खचलेल्या रस्त्याचे सबब एसटी महामंडळाने पुढे केले. त्यामुळे चंदगड बांधकाम उपविभागाने खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यास मंजुरी प्राप्त करून घेतली.
सोमवारपासून खचलेल्या रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने काम करत असताना तेथे कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याची सबब पुढे करत या घाटातील वाहतूक थांबविण्यात यावी, अशी मागणी चंदगड बांधकाम उपविभागाने येथील पोलिस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे हा घाट सर्वच वाहनांसाठी सोमवारपासून बंद झाला आहे.
हे आहेत पर्यायी मार्ग
- दोडामार्ग-मांगेली तळेवाडी ते चोर्लेमार्गे बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे.
- तसेच दोडामार्ग-साखळी ते चोर्ला घाट मार्गे बेळगाव आणि तळकट-कुंभवडे-आंबोली मार्गेही बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे.
- मोर्ले ते पारगड हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नसला तरी काहीजण या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे. यात दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करणाऱ्यांची पंचाईत होणार आहे.