Sindhudurg: ठेकेदाराने ६५ लाखांचा भविष्य निर्वाह निधीच भरला नाही, सावंतवाडीत भर पावसात सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:08 IST2025-09-15T19:06:37+5:302025-09-15T19:08:48+5:30
तब्बल ६५ लाखाचा गैरव्यवहार

Sindhudurg: ठेकेदाराने ६५ लाखांचा भविष्य निर्वाह निधीच भरला नाही, सावंतवाडीत भर पावसात सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन
सावंतवाडी : ऐन गणेशोत्सवात सफाई कामगाराचा पगार थकवणाऱ्या नगरपरिषद ठेकेदाराने मागील काही वर्षापासून कामगारांची ६५ लाख रूपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कमच परस्पर हडप केली असून कर्मचाऱ्यांचा निधीच त्याच्या खात्यात भरला गेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता पैसे कुठून देणार असा सवाल करत तब्बल साठ सफाई कामगारांनी भर पावसात सावंतवाडी नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन केले. रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. या सफाई कामगारा सोबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह विलास जाधव, सुरेश भोगटे यांनी ही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
शहरातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराने बुडवलेली ६५ लाखांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर सोमवारी उपोषण सुरू केले आहे. सायंकाळपर्यंत नगरपरिषद एकही अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी फिरकला नसल्याचे दिसून आले.पालिका अधिकारी या प्रकरणात लक्ष घालत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या उपोषणात केवळ कंत्राटी कर्मचारीच नाही, तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी नगरसेवकांनीही सहभाग घेत निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'पालिकेनेच ठेकेदारासोबत करारनामा केलेला असताना, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांशी आमचा संबंध नाही, असे अधिकारी कोणत्या आधारावर सांगतात ? उपोषणाला बसणार म्हणून कारवाईची धमकी देता. समोर या, मग बघतो!'' असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता असून जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आंदोलनाला रवी जाधव, अफरोज राजगुरू, पुंडलिक दळवी, उमेश खटावकर, राजू बेग, सुंदर गावडे, अनारीजिन लोबो, सुरेंद्र बांदेकर, निशिकांत तोरस्कर, अशोक पेडणेकर, बावती फर्नांडिस, मनोज घाटकर, सचिन माडये, कॉम्रेड धोंडीबा कुंभार, कामगार श्रमिक संघ, कामगार संघटना प्रमुख बाबू बरागडे, नितीन कोकरे, विनोद काष्टे, रवी कदम भारती लाखे, अंजली वेंगुर्लेकर, संगीता कदम, गौतमी तेंडुलकर, आशा बारागडे आदिंनी पाठींबा दिला.