Sindhudurg: ओसरगावात आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
By सुधीर राणे | Updated: February 26, 2025 16:17 IST2025-02-26T16:16:36+5:302025-02-26T16:17:46+5:30
फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी

Sindhudurg: ओसरगावात आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
कणकवली : तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एक जळालेल्या स्थितीत साधारणतः ३५ ते ४० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे, तसेच मृतदेह बाहेरून आणून येथे जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली.
ओसरगाव येथे एमव्हीडी कॉलेजपासून काही अंतरावर महामार्गापासून सुमारे १०० मीटरवर एकाच ठिकाणी आग पेटताना ग्रामस्थांना दिसून आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, बहुतांशी मृतदेह जळालेला होता, तर त्या महिलेचा फक्त एक पायच शिल्लक होता. त्यामध्ये पैंजणही आढळून आला आहे. त्या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून विविध माध्यमातून सुरू आहे, तसेच त्या महिलेचे घटनास्थळी पोलिसांना मिळालेले अवयव सायंकाळी उशिरा दफन करण्यात आले.
फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी
या घटनेबाबत माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक मारुती जगताप, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासहित अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गापासून सुमारे १०० मीटर अंतरावर मृतदेह पेट्रोल अथवा डिझेल ओतून जाळण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोल्हापूर येथून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावरून काही नमुने संकलित केले.
ओळख पटविण्यात पैंजण ठरू शकतात उपयोगी!
ती महिला कोण, हे अद्याप जरी स्पष्ट झाले नसले, तरी तिच्या पायात आढळलेले मोठ्या नक्षीचे पैंजण कानातली कुडी व हातातील बांगड्या यावरून ती महिला ही चिरेखाण किंवा अन्य ठिकाणी कामगार म्हणून आलेली होती का? हेही तपासण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.
तपासाचे पोलिसांसमोर आव्हान!
या महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला, त्या ठिकाणी वाळू होती, तसेच एक पाय अर्धवट जळालेल्या स्थितीत शिल्लक होता. त्याचबरोबर, शरीरातील डोक्याचा व हाडांचा भाग शिल्लक होता. बाकी सर्व मृतदेह जळून खाक झाला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणे हे कणकवली पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.